शेतक-यांवर पीक उपटून फेकण्याची पाळी
By Admin | Updated: September 19, 2014 23:53 IST2014-09-19T23:31:50+5:302014-09-19T23:53:11+5:30
वाशिम जिल्ह्यात पिवळा मोझ्कसह विविध किडींचा प्रादूर्भाव; शेतकरी हवालदील.

शेतक-यांवर पीक उपटून फेकण्याची पाळी
वाशिम : जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी झालेल्या एकूण २ लाख ९६ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास २0 टक्के क्षेत्रावरील पिक आजमितीला किडीने संपल्यात जमा आहे. कोणताही उपाय किड नियंत्रणातच न आल्याने पिक संपल्यात जमा झालेल्या शेतकर्यांनी अखेर इतर पिकाला त्या किडींचा धोका पोहचू नये म्हणून किडीने ग्रासलेले शेकडो एकरातील सोयाबीन उपटून फेकण्याचा सपाटा लावला आहे. जिल्ह्यात चालू खरिप हंगामात एकूण ४ लाख ११ हजार ९९४ हेक्टरवर ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सुर्यफूल, तिळ, सोयाबीन, कपाशी, उस, आदी पिकांची पेरणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वात जास्त पेरा सोयाबीनचा आहे. २ लाख ९६ हजार ५१९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. दूबार, तिबार पेरणीनंतर शेतकर्यांना ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन या नगदी पिकातून चांगले उत्पादन मिळण्याची आशा निर्माण झाली होती. परंतू जिल्हाभरातील शेतकर्यांच्या या आशेवर पिवळा मोझ्ॉक, तंबाखुची पाने खाणारी आळी, खोड सड यासह विविध रोगांनी ऑगस्ट अखेर व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लक्ष केल्याने आधीच विविध नैसर्गीक आपत्त्यांनी कंबरडे मोडलेल्या शेतकर्यांना पीक वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. किडीचा सर्वाधिक प्रादूर्भाव रिसोड तालुक्यात व त्यापाठोपाठ मालेगाव तालुक्यातील सोयाबीनवर असून वाशिम, मंगरुळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात झाला आहे. सपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेता जिल्ह्यातील २0 टक्के सोयाबीन विविध प्रकारच्या किडींनी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. रिसोड तालुक्यात जवळपास २0 टक्के, मालेगाव तालुक्यात जवळपास १७ टक्के, वाशिम तालुक्यात जवळपास १५ टक्के, मंगरुळपीर तालुक्यात जवळपास १0 टक्के त्यापाठोपाठ कमी अधिक प्रमाणात मानोरा व कारंजा तालुक्यातील सोयाबीन किडींमुळे नष्ट झल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.