गंभीर जखमी पोपटाच्या पायावर केले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:30 IST2021-05-29T04:30:13+5:302021-05-29T04:30:13+5:30
ग्राम सोमठाणा येथे २७ मे रोजी सोसाट्याच्या वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वेळी गंभीर जखमी अवस्थेतील एक पोपट खाजगी ...

गंभीर जखमी पोपटाच्या पायावर केले उपचार
ग्राम सोमठाणा येथे २७ मे रोजी सोसाट्याच्या वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वेळी गंभीर जखमी अवस्थेतील एक पोपट खाजगी पशुसेवक डाॅ. नंदकिशोर सावदे यांच्या घरासमोरील अंगणात येऊन पडल्याचे दिसून आले. डाॅ. सावदे यांनी क्षणाचाही विलंब न करता बाहेर जोरदार पाऊस सुरू असतानाही त्यास घरात घेतले. पोपटाच्या एका पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उडता येत नसल्याचे निदर्शनास आले. जखमांवर मलमपट्टी करण्याबरोबरच पोपटाच्या जखमी पायाला प्लास्टर बांधण्यात आले. २८ मे रोजी जखमी पोपटाला बऱ्यापैकी चालता, उडता येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पायाचे प्लास्टर काढून त्यास जंगलातील मुक्त स्वच्छंदी वातारणात सोडून देण्यात आले.
यापूर्वीसुद्धा वन्य जीव विभागाच्या सहकार्याने डाॅ. नंदकिशोर सावदे यांनी जखमी नीलगाय, हरणावर उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे. त्यांच्याकडून जखमी पशुपक्ष्यांवर करण्यात येत असलेल्या नि:स्वार्थ उपचाराचे गावकऱ्यांमधून कौतुक होत आहे.