सुरकंडी रस्त्यावर ट्रॅक्टर फसल्याने वाहतूक खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST2021-08-21T04:46:44+5:302021-08-21T04:46:44+5:30

वाशिम-हिंगोली मार्गावरील रेल्वे गेटपासून सुरकंडी, फाळेगाव, तसेच मोहगव्हाण, धुमका या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची ...

Traffic was disrupted when a tractor fell on Surakandi road | सुरकंडी रस्त्यावर ट्रॅक्टर फसल्याने वाहतूक खोळंबली

सुरकंडी रस्त्यावर ट्रॅक्टर फसल्याने वाहतूक खोळंबली

वाशिम-हिंगोली मार्गावरील रेल्वे गेटपासून सुरकंडी, फाळेगाव, तसेच मोहगव्हाण, धुमका या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. रेल्वे गेटपासून शासकीय निवासी शाळेपर्यंत तर चालणेही कठीण झाले होते. याबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दखल घेऊन २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये केवळ ३०० मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन सहा महिन्यांचा कालवधी उलटला आहे. रस्त्याचे काम जिथपर्यंत करण्यात आले. तेथे मुरुमाचा भराव टाकून जुना आणि नवीन रस्ता व्यवस्थित करण्याची गरज असतानाही संबंधित कंत्राटदाराने काहीच केले नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला. पावसामुळे या खड्ड्यातून दुचाकी वाहने बाहेर काढणे कठीण झाले होते. मोटारसायकलवरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या. २० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान मालवाहतूक करणारे ट्रॅक्टर फसले. रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टर फसल्यामुळे वाहतूक जवळपास दोन तास खोळंबली होती. शेवटी जेसीबी आणून ट्रॅक्टर बाजूला सारण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या ठिकाणी मुरुम टाकल्यानंतर त्याला तत्काळ रस्त्यावर टाकणे गरजेचे असताना, तसे न करता मातीमिश्रित मुरुम टाकून तसाच रस्त्यात ढीग घालून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने योग्य ती कारवाई करावी, तसेच उर्वरित रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी सुरकंडी, मोहगव्हाण येथील प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.

Web Title: Traffic was disrupted when a tractor fell on Surakandi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.