दोन अपघातात तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: December 28, 2015 00:17 IST2015-12-28T00:09:23+5:302015-12-28T00:17:52+5:30
तुळजापूर : अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका ५० वर्षीय महिला भाविकाचा मृत्यू झाला़ तर अज्ञात वाहनानेच दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले असून

दोन अपघातात तिघांचा मृत्यू
तुळजापूर : अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका ५० वर्षीय महिला भाविकाचा मृत्यू झाला़ तर अज्ञात वाहनानेच दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोन युवक ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे़ जखमीला सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ यातील एक अपघात बोरी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास तर दुसरा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास तुळजापूर शहरानजीक घडला़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील विवेक गोविंद भोसले (वय-२५), प्रशांत दत्तात्रय हुंडेकरी (वय-२२) व प्रशांत गोरख जाधव हे तिघे युवक शनिवारी रात्रीच्या सुमारास श्री गार्डन धाब्यापासून तुळजापूर शहराकडे दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५-एक्स़८१०४) येत होते़ त्यांची दुचाकी शहरानजीक आली असता अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली़ ही धडक इतकी भीषण होती की, विवेक भोसले व प्रशांत हुंडेकरी या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला़ तर जखमी प्रशांत जाधव याला उपचारासाठी तुळजापूर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ याबाबत प्रशांत सुनिल मेसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास पोउपनि जमदाडे हे करीत आहेत़
कळंब तालुक्यातील भाटसांगवी येथील शोभा खंडू अलाट (वय-५०) या रविवारी पहाटेच्या सुमारास पायी चालत तुळजापूरकडे येत होत्या़ शोभा अलाट या बोरी (ता़तुळजापूर) शिवारात आल्या असता अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली़ या अपघातात शोभा अलाट यांचा जागीच मृत्यू झाला़
याबाबत सुनिल खंडू अलाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकांविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ घटनेचा अधिक तपास पोउपनि अनिल किरवाडे हे करीत आहेत़ (वार्ताहर)