वाशिममध्ये स्वाभिमानी व आयटकच्या नेतृत्वात आशा सेविकांचे ठिय्या आंदोलन
By नंदकिशोर नारे | Updated: September 12, 2023 16:30 IST2023-09-12T16:29:18+5:302023-09-12T16:30:23+5:30
आशा सेविकांकडील अतिरिक्त ऑनलाईन कामे बंद करण्याची त्यांची प्रमुख मागणी होती. या संदर्भात आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषद प्रशासनाने इंगोले यांना दिले आहे.

वाशिममध्ये स्वाभिमानी व आयटकच्या नेतृत्वात आशा सेविकांचे ठिय्या आंदोलन
वाशिम: जिल्ह्यातील आशा सेविका गटप्रवर्तक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आयटकच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी मागण्या मान्य न झाल्यास आरोग्य मंत्र्यांच्या घरावर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.
आशा सेविकांकडील अतिरिक्त ऑनलाईन कामे बंद करण्याची त्यांची प्रमुख मागणी होती. या संदर्भात आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषद प्रशासनाने इंगोले यांना दिले आहे. आशा सेविकांना प्रधानमंत्री मात्रृ वंदना योजना, आ.भा कार्ड व गोल्डन कार्ड काढण्याचे ऑनलाइन काम व ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे काम आशा वर्कर यांना देऊन या कामाचे पर्यवेक्षणाचे काम गटप्रवर्तकांना देण्यात आले होते. ही कामे करण्याची क्षमता व शिक्षण नसल्याने ती कामे आशा सेविकांकडून काढून घेण्यात यावेत. यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील बहुतांश आशा सेविकांकडे स्मार्टफोन नाहीत, ब-याच आशा सेविकांची पुरेशी शैक्षणिक पात्रता नाही. त्यांना संगणकीय कामाचा कोणताही अनुभव अथवा प्रशिक्षण नाही, त्यांना इंग्रजी भाषेच परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे आशां सेविकांना कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन कामे करणे शक्य नाही. ही कामे करण्यासाठी आशा सेविकांसह गटप्रवर्तकांना तालुकास्तर व प्रा.आ.केंद्र स्तरावरुन मोठ्या प्रमाणात बळजबरी करून दबाव टाकला जात आहे. अनेक ठिकाणी आशा व गटप्रवर्तकांना कामा वरुन काढून टाकण्याची धमकी सुध्दा देण्यात येत आहे. त्यामुळे याविरोधात आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्याकडून हे ठिय्या आंदोलन करण्यात आले .