चोरीतील आरोपीला चोवीस तासात अटक
By Admin | Updated: December 24, 2014 00:37 IST2014-12-24T00:37:22+5:302014-12-24T00:37:22+5:30
वाशिम गुन्हे शाखेची कारवाई : जवाहर कॉलनीतील चोरी प्रकरण.

चोरीतील आरोपीला चोवीस तासात अटक
वाशिम : येथील जवाहर कॉलनीमध्ये असेलेल्या चरखा यांच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रूपये किंमतीचे नळ फिटींग साहित्य लंपास केले. ही घटना २१ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान घडली. ही घटना घडुन २४ तास होत नाहीत तोवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला मुद्देमालासह अटक केली. पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीनूसार जवाहर कॉलनी मध्ये वास्तव्यास असलेले हेमंत दामोदर चरखा यांच्या गोडाऊनच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. गोडाऊन मध्ये असलेले ३५ हजार रूपये किंमतीचे नळ फिटींग साहित्य चोरट्याने लंपास केले. या घटनेची चरखा यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये २३ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता फिर्याद दाखल केली. या फिर्यादीहून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक आर.पी. पाटील यांच्या पथकाला चोरट्याचा शोध घेण्यासाठी निर्देश दिले. पोलिस अधिक्षक पोकळे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार उत्तम गायकवाड, विनोद अवगळे, विपूल शेळके व संदीप ईढोळे यांच्या पथकाने मोठय़ा शिताफिने चोरट्याचा शोध घेऊन संतोष विजय वाघमारे या १९ वर्षीय आरोपीला मुद्देमालासह अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.