लसीकरण केंद्राबाहेर लागली चक्क चपलांची रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 12:18 IST2021-05-17T12:18:26+5:302021-05-17T12:18:44+5:30
Washim News : रांगेतून नंबर कटू नये, यासाठी चक्क चपलांचीच रांग लावण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.

लसीकरण केंद्राबाहेर लागली चक्क चपलांची रांग
लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव : येथील लसीकरण केंद्रावर सध्या पात्र असलेल्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. दरम्यान, एकाचवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आरोग्य विभागाने टोकन पद्धत अंगीकारण्यात आली आहे. दुसरीकडे १६ मे रोजी दुसरा डोस घ्यायला आलेल्या नागरिकांनी उभे राहून पाय दुखवून घेण्यापेक्षा उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घेतला. याचवेळी रांगेतून नंबर कटू नये, यासाठी चक्क चपलांचीच रांग लावण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.
कामरगाव येथे फेब्रुवारी महिण्यापासून कोरोनाने हाहा:कार माजविला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून कोरोनाने मृत्यूचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत वाढले आहे. परिणामी, कोरोनाविषयी नागरिकांच्या मनात आता मोठी दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, १६ मे पासून कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात डोस घेण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता लक्षात घेता वैद्यकीय अधिकरी डाॅ माधव ढोपरे यांनी लसीकरणासाठी आलेल्या नाागरिकांना निर्धारित वेळेचे कुपन देऊन गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
१६ मे रोजी लसीकरण केंद्रावर लसीचा दुसरा डोस मिळणार असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी सकाळपासून केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. दुपारच्या सुमारास उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी काही लोकांनी रांगेत चपला ठेवून झाडाच्या सावलीचा आधार घेतल्याचेही पाहावयास मिळाले.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता
कामरगाव येथे १६ मे पासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत लसीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पहिल्याच दिवशी गावातील पात्र नागरिकांनी लस घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.