रेल्वेस्थानक, बसस्थानकासह बहुतांश जिल्हासीमेवर तपासणीच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST2021-03-19T04:41:00+5:302021-03-19T04:41:00+5:30

वाशिम जिल्ह्यात सहा बसस्थानके, तर वाशिम येथे रेल्वेस्थानक आहे. रेल्वेस्थानकासह बसस्थानकातून विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. शिवाय ...

There is no inspection at most of the district boundaries including railway station and bus stand! | रेल्वेस्थानक, बसस्थानकासह बहुतांश जिल्हासीमेवर तपासणीच नाही !

रेल्वेस्थानक, बसस्थानकासह बहुतांश जिल्हासीमेवर तपासणीच नाही !

वाशिम जिल्ह्यात सहा बसस्थानके, तर वाशिम येथे रेल्वेस्थानक आहे. रेल्वेस्थानकासह बसस्थानकातून विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. शिवाय परजिल्ह्यातील शेकडो नागरिक एसटी बसने या ठिकाणी दाखल होतात. ही बाब लक्षात घेता येथे कोरोना नियंत्रणाचे उपाय आणि प्रवाशांची तपासणी आवश्यक आहे; परंतु अशी कोणतीच सुविधा येथे नाही. त्याशिवाय वाशिम जिल्ह्यास हिंगोली, अकोला, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्याच्या सीमा लागतात. यापैकी कारंजा तालुक्यात पाच ठिकाणी तहसीलदारांनी चेकपोस्ट सुरू केली आहे; परंतु मालेगाव, मानोरा, मंगरुळपीर, वाशिम आणि रिसोड तालुक्यातील जिल्ह्यांच्या बहुतांश सीमांवर कोणतीच चेकपोस्ट सुरू करण्यात आली नाही, तर कारंजा तालुक्यातील काही जिल्हा सीमांवरही तपासणीची कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे कोरोना रोखणार कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

१) जिल्ह्यातील सहाही बसस्थानकांमधून परजिल्ह्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. ही मंडळी परजिल्ह्यातून येणाऱ्या बसने जिल्ह्यात दाखल होतात. नजीकच्या अमरावती, यवतमाळसह अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक लक्षात घेता येथून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यातील संदिग्धांना विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे; परंतु असा कोणताही उपाय कोणत्याच बसस्थानकावर दिसला नाही.

बसस्थानकासाठी बॉक्स

२) जिल्ह्यातील सहाही बसस्थानकात परजिल्ह्यातून दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात असून, हे प्रवासी बसमधून उतरत बसस्थानकावर उपाहागृहे, प्रसाधनगृहांसह फलाटावर फिरताना दिसतात. यात कोरोनाबाधित प्रवासी असल्यास त्यांच्यामुळे बसस्थानकावर सतत कार्यरत कर्मचारी, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांसह इतरांना कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे.

३) कोण्याही बसस्थानकावर प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग किंवा इतर तपासणीची सुविधा नाहीच शिवाय त्यांची माहितीही नोंदविण्याची तसदी घेतली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.

------------

रेल्वेस्थानकात प्रवाशांचा मुक्तसंचार (18६ँ03)

१)जिल्ह्यात वाशिम येथे रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी हिंगोली, अकोल्यातून येणाऱ्या प्रवाशांसह परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. सद्य:स्थितीत रेल्वेगाड्यांची संख्या कमी असली तरी काही रेल्वे सुरू असल्याने प्रवाशांची ये-जा येथे असते. तथापि, रेल्वेस्थानकात कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर तपासणीची सुविधा करणे आवश्यक असताना तसा कोणताही प्रकार येथे होत नसल्याचे गुरुवारी केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले.

२) वाशिम येथील रेल्वेस्थानकावर सद्य:स्थितीत प्रवाशांची संख्या कमी आहे. रेल्वेगाड्यांची संख्याही कमी आहे; परंतु हिंगोली, नांदेड, अकोला या ठिकाणांहून वाशिम जिल्ह्यात दाखल होणाऱ्या आणि परत जाणाऱ्या परजिल्ह्यातील प्रवाशांचा येथील फलाटावर मुक्तसंचार असतो.

३) उपाहारगृहांसह इतर परिसरात हे प्रवासी मुक्तसंचार करीत असताना त्यांचा इतरांशी संपर्क होतो. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्यास वाव असल्याचे स्पष्ट होत आहे. .

-----------------

जिल्हा सीमांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

१) वाशिम जिल्ह्यास पाच जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत. यात कारंजा तालुक्यातील पाच सीमांवर चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या, तर मालेगाव, रिसोड आणि वाशिम तालुक्यातील बहुतांश जिल्हा सीमांवर कोणतीही चेकपोस्ट नाही. शिवाय कारंजा तालुक्यातीलही काही जिल्हा सीमांवर वाहनचालक.

२ ) जिल्हा सीमेवरून एसटी बसगाड्यांसह कार, मालवाहू वाहने, काळीपिवळीसह खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस मोठ्या प्रमाणात धावतात. यातील बहुतांश प्रवासी जिल्ह्यातच मुक्कामी असतात. त्यांचा इतरांशी संपर्क येत असल्याने तपासणी आवश्यक असताना तसे होत नाही.

३) कारंजा तालुक्यास अमरावती, यवतमाळसह अकोला जिल्ह्याची सीमा लागून असल्याने या तीन जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे.

कोेट: जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या तपासणीबाबत सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर संबंधितांना जाब विचारून योग्य ती कार्यवाही केली जाईल. जिल्ह्याच्या सर्वच सीमांवर चेकपोस्ट आवश्यक आहे काय, त्याची पडताळणी करू आणि योग्य त्या ठिकाणी चेकपोस्ट सुरू करून ये-जा करणाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना देऊ.

-शैलेश हिंगे,

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: There is no inspection at most of the district boundaries including railway station and bus stand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.