भाजयुमोच्या शहराध्यक्षाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची अखेर वाशिम मुख्यालयी बदली
By संतोष वानखडे | Updated: September 12, 2022 17:53 IST2022-09-12T17:51:47+5:302022-09-12T17:53:37+5:30
कारंजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील बजरंग पेठ परीसरात सहभागी मंडळातील सदस्य बंटी गाडगे यांच्यात व पोलिसात वाद झाला होता.

भाजयुमोच्या शहराध्यक्षाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची अखेर वाशिम मुख्यालयी बदली
कारंजा लाड (वाशिम) - कारंजा शहरात बजरंग पेठ परिसरात ९ सप्टेंबरला काढण्यात आलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी भाजयुमोचे शहराध्यक्ष अमोल गढवाले यांना अमानुष मारहाण केली होती. याप्रकरणाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांची वाशिम मुख्यालयी बदली करण्यात आली. यात सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव व पोलीस कर्मचारी फिरोज पठाण, चरण चव्हाण, रोहण तायडे आणि अनिल राठोड यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
कारंजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील बजरंग पेठ परीसरात सहभागी मंडळातील सदस्य बंटी गाडगे यांच्यात व पोलिसात वाद झाला होता. यावेळी पोलिसांनी गाडगे यांना शिवीगाळ केल्याने कारंजा येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमोल सुरेश गढवाले, हे मध्यस्थी करण्याकरीता गेले असता गैरअर्जदार सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत जाधव व पोलीस कर्मचारी फिरोज पठाण, चरण चव्हाण, रोहण तायडे व अनिल राठोड यांनी अमोल गढवाले यांना अवार्च्च भाषेत शिवीगाळ करून अमानुष मारहान केल्याची तक्रार वडील सुरेश कृष्णराव गढवाले यांनी शहर पोलिसात दिली होती. शिवाय गैरअर्जदारांनी त्यांच्या हातात असलेल्या काठ्यांनी व लाथाभुक्क्यांनी बेकायदेशीररीत्या एखादया निष्णात आरोपीसारखी मारहाण करून दुरपर्यंत फरपटत नेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याकडे तक्रार दाखल करताच, याची दखल घेत चौकशी करण्यात आली. मारहाण करणाऱ्या पोलिसांची वाशिम मुख्यालयी बदली करण्यात आली.