प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी झळकली; केवळ ४५० शेतकऱ्यांचा समावेश
By दिनेश पठाडे | Updated: March 17, 2023 15:24 IST2023-03-17T15:24:25+5:302023-03-17T15:24:43+5:30
११८२६ शेतकरी अजूनही प्रतीक्षेत, योजनेनुसार जिल्ह्यातील सर्व बँकांनी ३४ हजार २०२ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती.

प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी झळकली; केवळ ४५० शेतकऱ्यांचा समावेश
वाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. योजनेची चौथी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली असून त्यात केवळ ४५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अजूनही ११ हजार ८२६ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांकाची प्रतीक्षा आहे.
प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत सन २०१७-१८, २०१८-१९, वर २०१९-२० या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही २ वर्षात कर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्दल परतफेड केलेली रक्कम अथवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत लाभ दिला जात आहे. योजनेनुसार जिल्ह्यातील सर्व बँकांनी ३४ हजार २०२ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. यापैकी पहिल्या तीन याद्यांमध्ये २१ हजार ९२६ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला होता. त्यानंतरी चौथी यादीकडे १२ हजारांवर शेतकऱ्यांची लक्ष लागले होते. अखेर ही यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यात केवळ ४५० जणांचा समावेश असल्याने ११ हजारांवर शेतकऱ्यांना अनुदानासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आतापर्यंत विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या २२३७६ शेतकऱ्यांपैकी २१६९० जणांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. त्यापैकी २०३२७ शेतकऱ्यांच्या खात्यात ८४ कोटी.२३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, अशा सूचना सहकार विभागाकडून शुक्रवारी(दि.१७) देण्यात आल्या आहेत.