Washim: रिव्हर्सची कटकट मिटणार; वळण रस्ता बायपासशी जोडणार
By दिनेश पठाडे | Updated: March 23, 2024 18:59 IST2024-03-23T18:59:05+5:302024-03-23T18:59:48+5:30
Washim News: अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेड हा राष्ट्रीय चारपदरी रस्ता तयार करण्यात आला असून महामार्ग चकाचक झाला आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, हिंगोलीहून वाशिम शहरात येण्यासाठी बायपासजवळील वळण रस्त्यावर अवजड वाहनचालकांना तीन-चारदा रिव्हर्स गिअर टाकण्याची वेळ येत होती.

Washim: रिव्हर्सची कटकट मिटणार; वळण रस्ता बायपासशी जोडणार
- दिनेश पठाडे
वाशिम - अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेड हा राष्ट्रीय चारपदरी रस्ता तयार करण्यात आला असून महामार्ग चकाचक झाला आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, हिंगोलीहून वाशिम शहरात येण्यासाठी बायपासजवळील वळण रस्त्यावर अवजड वाहनचालकांना तीन-चारदा रिव्हर्स गिअर टाकण्याची वेळ येत होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून समस्या उजागर केली. त्याची दखल घेत काम सुरू करण्यात आले असून बायपास रस्ता वाशिम रस्त्याला जोडला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग चारपदरी सिमेंट काँक्रिटीकरणाचा तयार करण्यात आला आहे. वाशिम शहरातील वाहतूककोंडीची समस्या निकाली निघावी यासाठी वाशिम शहरानजीक बायपास निर्माण केला. मात्र, हिंगोलीवरून वाशिम शहरात येणाऱ्या वाहनचालकांना उड्डाणपुलाखालून वळण घेऊन पुन्हा डांबरीकरण रस्त्यावर यावे लागते. डांबरीकरण रस्त्यावर वळण घेताना विशेषत: अवजड वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याची स्थिती असून तीन ते चार वेळा वाहन रिव्हर्स घेण्याची वेळ येते.
त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जात होता, शिवाय अपघाताची भीती होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना बायपासजवळील जमीन उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे त्यावेळेस हे काम करणे शक्य झाले नाही. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली. आता नवीन कंत्राटदारामार्फत बायपास जवळ रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालून थेट वाशिममार्गाशी रस्ता जोडला जाणार असून रिव्हर्सची कटकट मिटणार आहे.