शिक्षक गिरविणार स्वच्छतेचे धडे!
By Admin | Updated: November 12, 2014 01:48 IST2014-11-12T01:48:59+5:302014-11-12T01:48:59+5:30
विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेची तपासणी: शिक्षकांना द्यावा लागणार कामकाजाचा अहवाल.

शिक्षक गिरविणार स्वच्छतेचे धडे!
वाशिम : राज्यभरातील शिक्षकांना नव्याने स्वच्छतेचे धडे गिरविण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत येत्या १४ ते १९ नोव्हेंबरपयर्ंत विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची तपासणी करण्यात येणार असून, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. पूर्वी एखादा विद्यार्थी स्नान न करता शाळेत आला, अथवा त्याच्या अंगावरचे कपडे मळलेले दिसले, तर शिक्षकांकडून आवर्जून विचारणा होत असे. प्रत्येक विद्यार्थ्याचा हात बघून, नखे वाढलेली नाहीत, हे बघितल्या जाई. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचे दात स्वच्छ आहेत की नाही, हेदेखील बघितल्या जात असे. वर्षातून एकदा शाळेत आरोग्य तपासणी होत असे. पालक कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बराच काळ घराबाहेर राहत असल्याने ते मुलांकडे फारसे लक्ष देऊ शकत नाहीत, याची शिक्षकांना जाणीव होती. गत काही वर्षांत मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ लागले. संस्कारक्षम वयात स्वच्छतेचे महत्त्व न समजल्याने पुढे त्याचे दुष्परिणाम दिसू लागले.