विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक
By Admin | Updated: March 30, 2017 13:52 IST2017-03-30T13:52:27+5:302017-03-30T13:52:27+5:30
आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक
मानोरा : तालुक्यामध्ये १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांची सहाव्या वेतन आयोगाची प्रलंबित थकबाकी द्यावी यासह अन्य मागण्या निकाली काढण्यासंदर्भात सर्व शिक्षक संघटनांनी गटविकास अधिकाऱ्यांशी सोमवारी चर्चा केली. आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
प्राप्त निवेदनानुसार अनेक वर्षापासून शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन वारंवार देवून आतापर्यंत सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकी ८ वर्षापासून प्रलंबित आहे. सदरील रक्कम आपल्या स्तरावर असून सुद्धा आमच्या खात्यात जमा केली नाही तसेच नवी अंशदान योजनेअंतर्गत जमा रक्कम किती व कोठे आणि त्या पावत्याचा हिशोब अद्यापपर्यंत गुलदस्त्यात असल्यामुळे सर्व शिक्षक संभ्रमात आहेत, असे निवेदनात नमूद आहे. प्रलंबित मागण्या वेळोवेळी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतरही केवळ आश्वासन मिळते, असे शिक्षकांनी यावेळी सांगितले. पंचायत समिती स्तरावरील प्रलंबित मागण्या येत्या ८ दिवसात निकाली काढाव्या अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटना, साने गुरुजी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखील भारतीय शिक्षक संघटना, उर्दु प्राथमिक शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक संघटना आदी संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. नवीन अशंदान पेन्शन योजनेअंतर्गत जमा रक्कमेच्या हिशोब पावत्या अद्याप मिळाल्या नाहीत, हा मुद्दा गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिला.