अहो आश्चर्यम्, चिखलीला एक महिन्यापासून ग्रामसेवकच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:32+5:302021-09-14T04:48:32+5:30
वाशिम : एका महिन्यापूर्वी प्रशासकीय बदली झाल्यानंतर चिखली (ता. रिसोड) येथील ग्रामसेवक पदाचा प्रभार अन्य कोणत्याही ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आला ...

अहो आश्चर्यम्, चिखलीला एक महिन्यापासून ग्रामसेवकच नाही!
वाशिम : एका महिन्यापूर्वी प्रशासकीय बदली झाल्यानंतर चिखली (ता. रिसोड) येथील ग्रामसेवक पदाचा प्रभार अन्य कोणत्याही ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आला नाही. ग्रामसेवकाअभावी प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून, प्रभार घेण्यास कुणी तयार नसल्याचे थातूरमातूर कारण दिले जात आहे.
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद स्तरावर २६ ते २८ जुलैदरम्यान कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली. चिखली येथील ग्रामसेवकांची बदली झाल्याने येथे दुसऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती होणे आवश्यक होते. मात्र, येथे ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही. साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या चिखली येथील ग्रामसेवक पदाचा प्रभारही एका महिन्यानंतरही अद्याप कुणाकडे देण्यात आला नाही. याबाबत सरपंच मनीषा रमेश अंभोरे यांनी पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा केला असता, प्रभार घेण्यास कुणी तयार नसल्याचे थातूरमातूर कारण देण्यात आले. एका महिन्यापासून ग्रामसेवक नसल्याने प्रशासकीय काम पूर्णत: ठप्प पडले आहे. चिखलीला एका महिन्यापासून ग्रामसेवक नसणे, ही बाब प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईची चिरफाड करण्यास पुरेशी ठरत आहे.
....
कोेट
ग्रामसेवकाची बदली झाल्यानंतर तेथे नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती किंवा त्या पदाचा प्रभार अन्य ग्रामसेवकांकडे दिला जातो. चिखली येथील प्रकरण नेमके काय आहे, याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांकडून घेतली जाईल. ग्रामसेवकाचा प्रश्न सोडविण्यात येईल.
- विवेक बोंद्रे,
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.
......
एका महिन्यापूर्वी चिखली येथील ग्रामसेवकाची बदली झाली. येथे नवीन ग्रामसेवक देण्यात आला नाही तसेच प्रभारदेखील अन्य ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आला नाही. त्यामुळे एक महिन्यापासून गावाला ग्रामसेवक नसल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे.
- मनीषा रमेश अंभोरे,
सरपंच, चिखली