Summer has come; Take care of your health | आला उन्हाळा; आरोग्य सांभाळा 

आला उन्हाळा; आरोग्य सांभाळा 

वाशिम : गत तीन, चार दिवसांपासून ऊन तापत असून, नागरिकांनी त्वचारोगाबरोबरच आरोग्य सांभाळावे, असे सल्ला आरोग्य विभागाने दिला.
उन्हाळा सुरु झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत: सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यताही अधिक असते. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. उन्हामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचा वापर नियमित करण्यात यावा. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. उन्हापासून बचाव म्हणून नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.


अशी घ्यावी काळजी

  • हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
  • बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, बुट व चपलाचा वापर करावा.
  • उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
  • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
  • गरोदर महिला व आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेण्यात यावी.


काय करू नये

  • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा.
  • दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.
  • शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.

 
अतिनील किरणांचे त्वचेवर होणारे परिणाम
उन्हातील अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे सर्वात जास्त नुकसान होते. उन्हामुळे प्रमाणाबाहेर घाम आल्यास, घामातील खारट द्रवामुळे धर्मग्रंथींची नलिका सुजते व त्यातून होणारा घामाचा प्रवाह बंद होतो. त्यामुळे साठून राहण्याºया घामाचा दबाव वाढून ग्रंथी फुटतात व त्यातून घामोळे तयार होते. प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे, व्रण उठणे आदी दुष्परिणाम जाणवतात.
 
 
कडक ऊन तापत असल्यामुळे आणि उन्हात फिरल्यास उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा धोका लक्षात घेऊन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. अशक्तपणा, डोकेदुखी, ताप येणे, चक्कर येत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. अनिल कावरखे
वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम
 
 
उन्हामुळे त्वचेवर परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर उन्हात जाणे टाळावे. जास्त प्रमाणात घाम आल्यास घामोळ्या होण्याची दाट शक्यता असते. उन्हातील अतिनील किरणांचे त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळून येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. विठ्ठल गोटे,
त्वचारोग तज्ज्ञ, वाशिम

Web Title: Summer has come; Take care of your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.