सायकल द्वारा डवरणीचा यशस्वी प्रयोग; एका दिवसात दहा एकर शेतीत डवरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:23 IST2018-07-30T13:22:22+5:302018-07-30T13:23:49+5:30
शेलुबाजार (जि. वाशिम) : शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी पाणी सुरु झाले तर ते थांबेपर्यंत शेती कामे करण्याची प्रतिक्षा करावी लागत होती, यावर तोडगा काढीत गोगरी येथील शिव मल्हार गृपने पावसातही डवरणी करण्याचा यशस्वी प्रयोग केला.

सायकल द्वारा डवरणीचा यशस्वी प्रयोग; एका दिवसात दहा एकर शेतीत डवरणी
- साहेबराव राठोड
शेलुबाजार (जि. वाशिम) : शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी पाणी सुरु झाले तर ते थांबेपर्यंत शेती कामे करण्याची प्रतिक्षा करावी लागत होती, यावर तोडगा काढीत गोगरी येथील शिव मल्हार गृपने पावसातही डवरणी करण्याचा यशस्वी प्रयोग केला. या प्रयोगाव्दारे एका दिवसात दहा एकर शेतीत डवरणी केली जाऊ शकते. तसा प्रयोगही त्यांनी शेलुबाजार परिसरातील एका शेतकऱ्यांच्या शेतात करुन दाखविला. या गृपच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतूक केल्या जात आहे.
हिरंगी येथील शेतकरी सतिष सावके यांच्याकडील शेतात शेतात तनकट जास्त प्रमाणात वाढल्याने सोयाबीनला डवरणी करायची होती. डवरणी करण्यासाठी बैलजोड़ी नाही, असती तरी सुध्दा बैलजोडीने गत दहा दिवसापासुन संततधार सुरु असल्याने ते शक्यही नव्हते. यावेळी त्यांनी सहज गोगरी येथील शिव मल्हार ग्रुपच्या सदस्यांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी ही शक्कल लढवून सायकलव्दारे डवरणी केली. आता हा गृप याव्दारे रोजगारही मिळवत आहे. या डवरणीमुळे विशेष पिकाचे नुकसान होत नाही व ५० ते ६० हजार रूपयाची बैल जोडीची देखभाल करायची सुध्दा आवश्यकता नाही. शेत ओलसर असले तरी सुद्धा सदर डवरणी करता येवू शकते. या ग्रुपमध्ये आठ सदस्य असुन एका दिवसात ते सरासरी दहा एकर डवरणी करीत आहेत. या गृपमध्ये गजानन साखरे, गणेश साखरे , राजु कुटे , खंडुभाऊ पाबळे , संदिप दाडके , विष्णु साखरे , करण साखरे , महादेव काडे , अमोल कंकने यांचा समावेश आहे.