विद्यार्थ्यांना नव्या पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:44+5:302021-07-30T04:43:44+5:30
विद्यार्थ्यांना पुस्तके जुनी मिळतील का, नवीन पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे का, असे एक ना अनेक प्रश्न पालक-विद्यार्थ्यांकडून ...

विद्यार्थ्यांना नव्या पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा
विद्यार्थ्यांना पुस्तके जुनी मिळतील का, नवीन पाठ्यपुस्तके दिली जाणार आहे का, असे एक ना अनेक प्रश्न पालक-विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. मुख्याध्यापकांनी चालू शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तकांची मागणी शिक्षण विभागाकडे केली असून, ऑनलाइन शिक्षणासाठीही पुस्तक महत्त्वाचे आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके येत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास किती पचनी पडेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सेतू वर्गातील अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके साहाय्यभूत ठरणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने त्वरित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. शिक्षण विभाग जिल्हास्तरावरून तालुका स्तरावर व तेथून शाळेत व विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचविणार आहे. त्यामुळे शाळेतून नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार असा प्रश्न आहे. यात शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन प्राधान्याने कामे करून विद्यार्थी आणि पालकांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी होत आहे.
-----
गटशिक्षणाधिकारी कार्यालयास ५० टक्के पुस्तकांचा पुरवठा
पन्नास टक्के पाठ्यपुस्तके आली
आतापर्यंत तालुक्यात सुमारे पन्नास टक्के पाठ्यपुस्तके गटशिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहेत. उर्वरित पुस्तके दोन-तीन दिवसांत मिळतील, अशी अपेक्षा आहे. जुन्या पाठ्यपुस्तकांचा विचार करता आतापर्यंत २५ टक्के ती जमा झाली आहेत. सेतू अभ्यासक्रमासाठी तालुक्यातील शिक्षक गट पद्धतीने शाळेच्या आवारात किंवा गावातील खुल्या मैदानावर शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
------------
कोट :
गटसाधन केंद्रात नव्या पाठ्यक्रमाची पुस्तके आली आहेत. अजून काही पुस्तके येणे बाकी आहेत. उपलब्ध झालेली पुस्तके संबंधित यंत्रणेमार्फत शाळेत पोहोचविली जाणार आहेत.
-गजानन परांडे
प्रभारी गटशिक्षणाधिकारी मालेगाव