महसूल कर्मचा-यांची लेखणी बंद
By Admin | Updated: April 13, 2016 01:19 IST2016-04-13T01:19:05+5:302016-04-13T01:19:05+5:30
वाशिम जिल्ह्यातील कर्मचा-यांची प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी.

महसूल कर्मचा-यांची लेखणी बंद
वाशिम: प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील महसूल कर्मचार्यांनी १२ एप्रिल रोजी लेखणी बंद आंदोलन केले.
नायब तहसीलदारांचा ग्रेड पे ४ हजार ३00 रुपयांवरून ४ हजार ६00 रुपये करणे, महसूल लिपिकांचे पदनाम बदलून महसूल सहायक करणे, कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देणे, शिपायांना सायकलऐवजी मोटारसायकल अग्रीम मान्य करणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरणे या प्रमुख सहा मागण्या ६ ऑगस्ट २0१५ रोजी मान्य करण्यात आल्या होत्या. याबाबतचा शासननिर्णयही लवकरच निघेल, असे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापपर्यंतही याबाबत ठोस निर्णय झाला नाही. परिणामी, महसूल कर्मचार्यांच्या प्रमुख मागण्या शासनदरबारी ह्यजैसे थेह्ण आहेत. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही काहीच तोडगा निघत नसल्याचे पाहून १0 मार्चपासून महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. १0 मार्च रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही शासन ठोस निर्णय घेत नसल्याचे पाहून २२ मार्चला काळ्या फिती लावून महसूल कर्मचार्यांनी कामकाज केले. याउपरही शासन दखल घेत नसल्याचे पाहून आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणून १२ एप्रिल रोजी जिल्ह्यातील महसूल कर्मचार्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. सर्व कर्मचार्यांनी कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद ठेवली. वाशिम तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरुळपीर तहसील कार्यालयातील कर्मचार्यांच्या लेखणी बंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. लेखणी बंद आंदोलनामुळे महसूल विभागाचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प होते.