विविध मागण्यांसाठी आयटक संघटनेचे आराेग्य अधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:55+5:302021-06-05T04:28:55+5:30
आरोग्य विभागातील शेवटचा घटक म्हणून राज्यभरात जवळपास ७० हजारांपेक्षाही अधिक तर वाशिम जिल्ह्यात ९६८ आशा व ४८ गटप्रवर्तक ...

विविध मागण्यांसाठी आयटक संघटनेचे आराेग्य अधिकाऱ्यांना निवेदन
आरोग्य विभागातील शेवटचा घटक म्हणून राज्यभरात जवळपास ७० हजारांपेक्षाही अधिक तर वाशिम जिल्ह्यात ९६८ आशा व ४८ गटप्रवर्तक या सन २००९ पासून काम करतात मात्र त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने आशा व गटप्रवर्तकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. काेराेना काळात आशा व गटप्रवर्तकांवर असंख्य कामे लादण्यात आलेले आहेत, मात्र जीव धोक्यात घालून ही सर्व कामे निमुटपणे करीत असताना आशांना पुरेशा संरक्षण सोयी सुविधा उपलब्ध करून देणे तर सोडाच परंतु योग्य मोबदलाही मिळत नसल्याचे वास्तव आहे. आशांना दरमहा अठरा हजार रुपये तर गटप्रवर्तकांना दरमहा एकवीस हजार रुपये मानधन देणे, आशा गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत नियमितपणे सामावून घेणे यासह विविध मागण्या आयटक संघटनेच्या वतीने गेल्या दशकभरापासून शासन दरबारी करण्यात येत आहेत. यासाठी अनेकदा उपोषण, काम बंद आंदोलन, लाक्षणिक संप, यासारखे आंदोलन सुद्धा आयटक संघटनेच्या वतीने करण्यात आले, मात्र दरम्यानच्या कालावधीत शासनकर्ते व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आशा गटप्रवर्तकांच्या पदरात केवळ आश्वासनाची खैरातच टाकण्यात आली . आशा गटप्रवर्तकांनी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उगारले असून येत्या १४ जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास शासकीय तथा प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी १५ जून रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप तर १६ जूनपासून आशा गटप्रवर्तकांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही काम न करण्याचा पवित्रा आयटक संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. त्या बाबत आयटकचे राज्याध्यक्ष कॉ. राजू देसले, राज्य उपाध्यक्ष कॉ. मुगाजी बुरुड यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष संगीता काळबांडे जिल्हा संघटिका वंदना हिवराळे, गटप्रवर्तक वंदना चव्हाण, विजया मंत्री, वर्षा सावळे, सुरेखा मोरे, आशा सेविका विशाखा वानखेडे, वर्षा भगत, छाया जाधव ,नंदा वानखेडे ,यांनी मालेगाव तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.