सोयाबीनच्या शेतात साचले पाणी; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणेल का कोणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:00+5:302021-09-27T04:45:00+5:30

वाशिम : गत चार, पाच दिवसांत संततधार पावसाने सोयाबीनला जबर हानी पोहोचविली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले आहे. ...

Stagnant water in soybean fields; Will anyone know the plight of the farmers? | सोयाबीनच्या शेतात साचले पाणी; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणेल का कोणी?

सोयाबीनच्या शेतात साचले पाणी; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणेल का कोणी?

वाशिम : गत चार, पाच दिवसांत संततधार पावसाने सोयाबीनला जबर हानी पोहोचविली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने शेतमालाची प्रतवारी घसरण्याची दाट शक्यता असून, नुकसानभरपाई मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

गतवर्षातील आर्थिक नुकसान विसरून यंदा नव्या उमेदीने शेतकरी शेतीच्या कामाला लागला. यंदा जिल्ह्यात तीन लाख हेक्टरच्या वर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. बाजारभावात घसरण सुरूच असल्याने अगोदरच शेतकरी चिंतातुर आहेत. त्यातच संततधार पावसाने भर घातल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू असतानाच, गत चार-पाच दिवसांत जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनच्या शेतात पाणी साचले. सोंगणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या शेंगांना अनेक ठिकाणी कोंब फुटत आहेत, तर काही ठिकाणी सोयाबीनच्या गंजी जागच्या जागीच काळवंडत असल्याचे दिसून येते. यामुळे लागवड खर्च निघतो की नाही? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सोयाबीनच्या एक एकर शेतीत मशागत, पेरणी, फवारणी, मजुरी, सोंगणी व काढणी, असा एकंदर १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास संततधार पावसाने हिरावून घेतल्यामुळे नैसर्गिक आपत्तीसमोर शेतकरी हतबल ठरत आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा प्रत्यक्ष शेतात येऊन पाहणी करेल का, नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा होईल का, समाधानकारक भरपाई मिळेल का, आदी प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केले जात आहे.

.............

पावसामुळे प्रतवारीला धोका!

पावसामुळे सोयाबीन भिजल्याने प्रतवारी घसरण्याचा धोका आहे. भिजलेली सोयाबीन काळवंडली तर प्रति क्विंटल २२०० ते २८०० रुपयांदरम्यान दर मिळू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लागवड खर्च वसूल होईल की नाही, याची चिंता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागली आहे.

..................

सोयाबीनचा एकूण पेरा (हेक्टर)- ३०२०००

नुकसान झाल्याचा अंदाज (हेक्टर) - ५२००

..................

पावसामुळे सोयाबीनचे नुकसान; भरपाई मिळावी

कोट

विविध संकटांमुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होत आहे. आता पावसामुळे सोयाबीनला हानी पोहोचली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे.

- सुभाष नानवटे

शेतकरी, दोडकी

.....

गत चार, पाच दिवसांत संततधार पाऊस झाल्याने सोयाबीनच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी.

- श्याम बढे,

शेतकरी, रिधोरा

.....

यंदादेखील शेतकऱ्यांना विविध संकटांतून जावे लागत आहे. अगोदर बाजारभाव कोसळले, आता पावसाने शेतकऱ्यांना झोडपले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळायला हवी.

- संजयकुमार सरनाईक,

शेतकरी, चिखली

Web Title: Stagnant water in soybean fields; Will anyone know the plight of the farmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.