कोरोनाबाधितांच्या मतदानासाठी प्रशासनाची विशेष व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:03+5:302021-01-13T05:45:03+5:30
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेत कोरोनाबाधित असलेल्या, मात्र क्वारंटाईन ...

कोरोनाबाधितांच्या मतदानासाठी प्रशासनाची विशेष व्यवस्था
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेत कोरोनाबाधित असलेल्या, मात्र क्वारंटाईन असलेल्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने निवडणूक विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी पीपीई कीट देण्यात येणार आहेत. त्याशिवाय कोरोनाबाधितांना मतदानासाठी ठरवून दिलेल्या वेळेत इतर लोकांना कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी प्रवेश दिला जाणार नाही.
-------
क्वारंटाईनसाठी मतदानाची वेळ राखीव
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात कोरोनाबाधितांना मतदान करता यावे म्हणून सायंकाळी ५ वाजतानंतरची वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया साधारण अर्धा तास किंवा तासभर चालणार असून, या काळात मतदान केंद्रांवरील सर्वच कर्मचारी पीपीई कीटमध्ये आपली जबाबदारी पार पाडणार आहेत.
------
बाधितांच्या यादीतील नावाची पडताळणी
मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या बाधित व्यक्तीला मास्क लावणे आवश्यक राहणार आहे. अशात त्याची ओळख पटावी म्हणून आरोग्य विभागाकडील बाधितांच्या यादीतील नाव आणि ओळखपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे.
----------
येत्या १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदानासाठी येणाऱ्या कोरोनाबाधितांना सायंकाळी चार वाजतानंतर मतदानासाठी राखीव वेळ ठेवण्यात आली आहे. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पीपीई कीटही दिले जाणार आहेत.
- सुनील विंचनकर
जिल्हा निवडणूक अधिकारी
--