चार दिवसांत सोयाबीन दरात २ हजारांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 16:40 IST2021-08-11T16:39:48+5:302021-08-11T16:40:10+5:30
Soyabean rate : सोयाबीनच्या दरात २ हजारांची घसरण झाल्याचे बाजार समित्यांकडील माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

चार दिवसांत सोयाबीन दरात २ हजारांची घसरण
वाशिम : जवळपास ११ हजार रुपये प्रतिक्विंटल दरापर्यंत पोहोचलेले सोयाबीनचे दर आता झपाट्याने घसरत आहेत. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात २ हजारांची घसरण झाल्याचे बाजार समित्यांकडील माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात गतवर्षी ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आल्याने उत्पादनात घट आली. राज्यभरात आणि देशातही अशीच स्थिती असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना, घाणा आणि चीनसह इतर काही देशांतही सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत अचानक वाढ झाली. त्यामुळेच जिल्ह्यात पाहता-पाहता सोयाबीनचे दर ४ हजार रुपये प्रतिक्विंटलहून १० हजार ८५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले. प्रत्यक्षात या दरवाढीचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. तथापि, स्थानिक व्यापाऱ्यांनी सुरुवातीला काही प्रमाणात सोयाबीन खरेदी करून ठेवले. त्यांचा थोडाफार फायदा झाला, तर शेकडा दोन ते पाच टक्के शेतकऱ्यांना सोयाबीनच्या सर्वोच्च दराचा लाभ चांगलाच झाला. आता मात्र सोयाबीनचे दर घसरू लागले आहेत. कारंजा, मंगरुळपीर, रिसोडसह मानोरा बाजार समितीमधील मंगळवारच्या खरेदीवरून सोयाबीनचे दर २० हजारांनी घसरल्याचे दिसून आले.