वाशिममध्ये सरपंच, ग्रामसेवकांना घन कचरा व्यवस्थापनाचे धडे
By संतोष वानखडे | Updated: May 3, 2023 16:58 IST2023-05-03T16:57:59+5:302023-05-03T16:58:26+5:30
गावातील घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले होते.

वाशिममध्ये सरपंच, ग्रामसेवकांना घन कचरा व्यवस्थापनाचे धडे
वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात समाविष्ट ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांना वाशिम येथे दोन दिवशीय प्रशिक्षण दिले असून, ३ मे रोजी या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.
गावातील घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले होते. त्यानुसार २ व ३ मे दरम्यान जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. प्रशिक्षणाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, कोल्हापुर येथील प्रशिक्षक विद्याधर कुरतडकर, सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने यांची उपस्थिती होती. ३ मे रोजी या प्रशिक्षणाचा समारोप जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
प्लास्टिक कचरा नकोच
प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण होतात तसेच जनावरांच्या आरोग्यासाठी हा कचरा धोकादायक ठरतो, असे कोल्हापुर येथील प्रशिक्षक विद्याधर कुरतडकर यांनी सांगितले. गावातील घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयाचे मास्टर ट्रेनर म्हणून विद्याधर कुरतडकर यांनी सरपंच व ग्रामसचिवांना मार्गदर्शन केले. त्यांनी प्लास्टिक कचरा, ई-कचरा व त्याचे दुष्परिणाम विषद केले.