Shiv Bhojans will also be available on the taluka level from today | आजपासून तालुकास्तरावरही मिळणार शिवभोजन

आजपासून तालुकास्तरावरही मिळणार शिवभोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे, यासाठी सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेची २६ जानेवारी पासून राज्यातील जिल्हास्तरावर अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून १ एप्रिलपासून शिवभोजन योजना तालुक्याच्या ठिकाणीदेखील सुरू होणार आहे.
गरजू व गरीब व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे या उद्देशाने शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. पात्र लाभार्थीनुसार प्रत्येक जिल्ह्यात शिवभोजनालय सुरू करून थाळीचे उद्दिष्टही देण्यात आले. या योजनेची व्याप्ती १ एप्रिलपासून वाढविण्यात येणार असून, प्रत्येक तालुकास्तरावरही शिवभोजन मिळणार आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने तालुकास्तरावर शिवभोजनालये सुरु करण्याची कार्यवाही केली आहे. १ एप्रिलपासून तालुकास्तरावर पात्र लाभार्थींना शिवभोजन मिळणार आहे. वाशिमसह अमरावती विभागात यासंदर्भात कार्यवाही पूर्ण झाली आहे. वाशिम जिल्ह्यात रिसोड, कारंजा व मंगरूळपीर येथे प्रत्येकी २०० थाळी, तर मालेगाव आणि मानोरा येथे प्रत्येकी १५० थाळीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तालुकास्तरीय समितीने निश्चित केलेल्या शिवभोजनालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजनाचा लाभ घेता येणार आहे.


१ एप्रिलपासून तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेची कार्यवाही वाशिम जिल्ह्यात पूर्ण झाली आहे.
- राजेंद्र जाधव
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Shiv Bhojans will also be available on the taluka level from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.