मांगवाडी शिवारात बहरली शेवंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:22+5:302021-09-27T04:45:22+5:30
भर जहागीर: परिसरातील शेतकऱ्यांचा कल फुलशेतीकडे वाढला आहे. यात मांगवाडी परिसरात अवघ्या २० गुंठे क्षेत्रावर अल्पभूधारक शेतकरी मारोती वाळके ...

मांगवाडी शिवारात बहरली शेवंती!
भर जहागीर: परिसरातील शेतकऱ्यांचा कल फुलशेतीकडे वाढला आहे. यात मांगवाडी परिसरात अवघ्या २० गुंठे क्षेत्रावर अल्पभूधारक शेतकरी मारोती वाळके यांनी शेवंती फुलांची लागवड केली आहे. ही फुलशेती चांगलीच बहरली असून, या शेतीच्या आधारे मारोती वाळके भरघोस उत्पन्न मिळवित आहेत.
निसर्गाचा लहरीपणा, वाढलेले बियाणे, खतांचे दर, बाजार व्यवस्थेची अनिश्चितता आदी कारणांमुळे पारंपरिक पीक पद्धतीची शेती आता शेतकऱ्यांना परवडणारी राहिली नाही. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यात काही शेतकरी फळपिकांसह फुलशेतीकडे वळले आहेत. यात भर जहागीर परिसरातील मांगवाडी येथील शेतकरी मारोती वाळके यांनी हंगामी पिकांना बदल देत अवघ्या २० गुंठे क्षेत्रावर शेवंती फुलांच्या रोपांची लावगड केली. शेवंती फुलांना वर्षभर मागणी असून, ही फुले प्रतिकिलो शंभर रुपये दराने विकली जात असल्याने मारोती वाळके यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. शिवाय २० गुंठे क्षेत्रावर त्यांनी झेंडू फुलांचीही लागवड केली असून, यातून जवळपास दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
०००००००००००००
बहुपीक पद्धतीवर भर
मांगवाडी येथील शेतकरी मारोती वाळके यांनी पारंपरिक पिकांना बगल देत केवळ फुलशेतीवरच भर दिला नाही, तर त्यांनी बहुपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यांनी आपल्या शेतात तायवान पपईसह इतरही फळपिकांची लागवड केली आहे. अवघे सहा गुंठे क्षेत्रावर त्यांनी पपईची लागवड केली असून, त्यात २०० झाडांना भरघोस फळे लागली आहेत. लॉकडाऊन काळात शेतालगत रस्त्यावर पपईची विक्री करून त्यांनी प्रती झाड १,२०० रुपये उत्पन्न मिळविले.
००००००००००००००
कोट: मी पूर्वी वाहनचालक म्हणून काम करायचो, परंतु लाॅकडाऊनमुळे वाहतूक बंद पडल्याने काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने बहुपीक पद्धतीची शेती करायचे ठरविले. त्यात शेवंती, तायवान पपई, झेंडू अशा विविध पिकांची लागवड केली. त्यात यश आले आणि घसघशीत उत्पन्न मिळाल्याने शेती करण्याचा उत्साह वाढला.
- मारोती वाळके,
अल्पभूधारक शेतकरी मांगवाडी
260921\26wsm_2_26092021_35.jpg
शिवारात बहरली शेवंती !