शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

By Admin | Updated: May 1, 2017 02:21 IST2017-05-01T02:21:02+5:302017-05-01T02:21:02+5:30

शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

Shankaracharya should be formed on a seven-point basis nation! | शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे!

वाशिम : स्वत: विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण करणाऱ्या भगवान शंकराची करुणा आदि शंकराचार्यांच्या हृदयात वास करीत होती. त्यांनी सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब करीत सनातन धर्माची (सध्याचा हिंदू धर्म) स्थापना केली. त्याच चतु:सूत्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत देशातील १२५ कोटी जनतेने राष्ट्रनिर्माणात हातभार लावावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे रविवारी केले.
स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आदि शंकराचार्य यांचा जयंती महोत्सव पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास श्रुतिसागर आश्रम, फुलगाव (पुणे)चे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती, प्रमुख आचार्य माता स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्यासह श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील संत डॉ. रामराव महाराज, अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदूरचे संत बाबा महाराज तराणेकर, वासुदेव आश्रम अभ्यासिका वाशिमचे विजयकाका पोफळी महाराज यांची विशेष उपस्थिती; केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पुढे बोलताना डॉ. भागवत म्हणाले, की पूर्वीच्या सनातन धर्माचे आधुनिक रुप म्हणजे हिंदू होय. त्यावरूनच देशाचे नाव हिंदुस्थान पडले. ही देण आदि शंकराचार्यांची आहे. शंकराचार्यांच्या हृदयात साक्षात भगवान शंकराप्रमाणे करुणा होती. त्यांनी आपल्या आयुष्यात सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब करून विश्वकल्याणाची मनीषा बाळगली. त्यांच्या त्याच आदर्श विचारांना प्रत्येकाने आपल्या आयुष्यात स्थान देऊन राष्ट्रनिर्माणाचे ध्येय बाळगावे, असे आवाहन डॉ. मोहन भागवत यांनी केले. स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि माता स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांनीही उपस्थितांना मागदर्शन केले. याप्रसंगी भगवतत्पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्काराने बडवाह (मध्य प्रदेश) येथील श्रीराम महाराज यांना; तर वेदसंवर्धन पुरस्काराने वे.शा.सं. वाजपेयाजी चैतन्य नारायण काळे (सोलापूर) यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गठित करण्यात आलेल्या विविध नियोजन समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

सरसंघचालकांनी केला वाशिमकरांचा सन्मान!
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात वाशिमकरांचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे सांगून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी वाशिमकरांचा यावेळी सन्मान केला. संपूर्ण जिल्हावासीयांचा सन्मान म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आयोजक अ‍ॅड. विजय जाधव आणि प्रा. दिलीप जोशी यांचा सत्कार सरसंघचालकांनी केला.

Web Title: Shankaracharya should be formed on a seven-point basis nation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.