तांदळाच्या तीन कट्ट्यावर आढळला ‘सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड’चा शिक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 18:36 IST2020-07-26T18:36:02+5:302020-07-26T18:36:29+5:30
२६ जुलै रोजी पुरवठा व पोलीस विभागाने संयुक्तरित्या तांदळाची तपासणी केली.

तांदळाच्या तीन कट्ट्यावर आढळला ‘सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड’चा शिक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : एसटी महामंडळाच्या मालवाहू बसमधून वाहतूक होत असलेला तांदूळ कारंजा शहर पोलिसांनी २५ जुलै रोजी कोळी फाट्याजवळ पकडल्यानंतर, २६ जुलै रोजी पुरवठा व पोलीस विभागाने संयुक्तरित्या तांदळाची तपासणी केली. यावेळी तीन कट्टयावर मध्यप्रदेश, स्टेट सिव्हील, सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड आर. एम. एस. २०१९-२० व्हिट असा शिक्का असल्याचे आढळून आले.
शेलुबाजार येथून कारंजा मार्गे तुमसर, भंडाराकडे जाणाºया महामंडळाच्या मालवाहू बसमध्ये सरकारी तांदूळ नेत नसल्याची गुप्त माहिती ठाणेदार सतिष पाटील यांना मिळाली होती. यावरून नाकाबंदी करीत कोळी गावाजवळ शेलुबाजार मार्गे येत असताना एम.एच.१४ बी.टी.०८५६ क्रमांकाची बस थांबवून चौकशीसाठी कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर तहसिलदारांशी पुढील कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार, २६ जुलै रोजी पुरवठा विभाग आणि पोलीस पथकाने मालवाहू बसमधील तांदळाची तपासणी केली. यावेळी तांदळाचे एकूण २०० कट्टे आढळले असून, यापैकी तीन कट्ट्यावर मध्यप्रदेश, स्टेट सिव्हील, सप्लाईज कार्पोरेशन लिमिटेड आर.एम.एस २०१९-२० व्हिट असा शिक्का आढळून आला. कारंजा तहसिलदार धीरज मांजरे यांनी सखोल तपासासाठी कारंजा पोलिसांना पत्र दिले असून पोलीस तपासात काय निष्पन्न होते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. तपासादरम्यान तांदळाचे कट्टे व मालवाहतूक करणारी बस पोलिसांच्या ताब्यात राहिल, असे ठाणेदार पाटील यांनी सांगितले. यापूर्वीही मंगरूळपीर येथे दोनदा व कारंजा येथे एकदा तांदळाचा ट्रक पोलिसांनी पकडला होता.