रेशनचे धान्य विक्रीला; १३ रुपये किलोने खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:48+5:302021-09-14T04:48:48+5:30
कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचे रोजगार हिरावले. उद्योगधंदे ठप्प झाल्याने काही लोकांवर उपासमारीची वेळ ओढवली. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून स्वस्त ...

रेशनचे धान्य विक्रीला; १३ रुपये किलोने खरेदी!
कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचे रोजगार हिरावले. उद्योगधंदे ठप्प झाल्याने काही लोकांवर उपासमारीची वेळ ओढवली. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांमार्फत मध्यंतरी मोफत; तर आता नाममात्र दराने रेशन कार्डधारकांना धान्य पुरविणे सुरू आहे. त्यातील अनेकांची आर्थिक परिस्थिती मजबूत असून स्वयंपाकात रेशनचा ना गहू वापरता जातो, ना तांदूळ. असे असताना स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन ते बाजारात चक्क विकले जात आहे. गव्हाला साधारणत: १३ रुपये; तर तांदुळाला १० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याची माहिती प्राप्त झाली.
..................
१३ रुपये किलो गहू
स्वस्त धान्य दुकानातून मोफत मिळणारा गहू लाभार्थींकडून बाजारात १३ रुपये किलो दराने विक्री केला जात आहे. खरेदीदारांची मोठी टोळी प्रत्येकच शहरात सक्रिय असल्याने हा प्रकार बळावला आहे.
...............
हे घ्या पुरावे...
वाशिम
वाशिम शहरात पुसद नाका, शुक्रवार पेठ, गणेश पेठ, देव पेठ आदी भागात असलेल्या स्वस्त धान्य दुकानांतून धान्य आणून ते बाहेर विक्री केले जात आहे. खरेदीदारही ठरलेले असून त्यांचाही फायदा होत आहे.
...........
मंगरूळपीर
मंगरूळपीर शहरात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ७ आणि ९ मध्ये रेशनच्या धान्याची बाहेर बाजारात खुलेआम विक्री केली जाते. याशिवाय दाभा आणि आसेगाव सर्कलमध्येही हा प्रकार घडत आहे.
.............
कारंजा
कारंजा शहरातील काही भागासह तालुक्यातील मनभा, उंबर्डा, कामरगाव याठिकाणी प्रामुख्याने रेशनचे धान्य खुल्या बाजारात विक्री होण्याचा प्रकार बळावला आहे. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
............
कोट :
कोरोनाचा संकटकाळ लक्षात घेता आजही शासनस्तरावरून स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थींना मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. लाभार्थींनी त्याचा वापर कुटुंबासाठी करावा, धान्याची विक्री करू नये, असे अपेक्षित आहे. रेशनच्या बाजारातील धान्य विक्रीवर निर्बंध आणले जातील.
-संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम