आरटीई : केवळ ३४ हजार विद्यार्थ्याचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:51 IST2020-08-19T17:51:45+5:302020-08-19T17:51:52+5:30
आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

आरटीई : केवळ ३४ हजार विद्यार्थ्याचे प्रवेश
वाशिम: आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी २.९१ लाख आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिल्या लॉटरी पद्धतीत १ लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. तथापि, कोरोना परिस्थितीमुळे प्रवेश प्रक्रिया प्रभावित झाली असून, आजवर केवळ ३४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. आरटीई अंतर्गत राज्यात ९३३१ खासगी शाळांची नोंदणी झाली असून, मोफत प्रवेशासाठी १ लाख १५ हजार ४५५ जागा राखीव आहेत. यासाठी राज्यात दोन लाख ९१ हजार ३६८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरी पद्धतीतून मार्च महिन्यात एक लाख ९२६ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियाही प्रभावित झाली असून, यावर्षी शाळास्तरावरच कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर थेट प्रवेश देण्यात येत आहेत. परंतू, या प्रक्रियेलाही पालकांचा फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येते. १७ आॅगस्टपर्यंत केवळ ३४ हजार ५६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ५३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.