आरटीई : मोफत प्रवेशाच्या १.१५ लाख जागांसाठी २.८५ लाख ऑनलाईन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 13:51 IST2020-03-03T13:51:18+5:302020-03-03T13:51:32+5:30
२ मार्चपर्यंत वाशिमसह राज्यातील १.१५ लाख जागेसाठी २.८५ लाख अर्ज प्राप्त झाले.

आरटीई : मोफत प्रवेशाच्या १.१५ लाख जागांसाठी २.८५ लाख ऑनलाईन अर्ज
मोफत प्रवेश प्रक्रिया : अर्जासाठी ४ मार्चपर्यंत मुदतवाढ
वाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन-शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत राज्यात खासगी शाळांमध्ये पात्र बालकांना २५ टक्के राखीव जागेतून मोफत प्रवेश देण्यासाठी २ मार्चपर्यंत आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. २ मार्चपर्यंत वाशिमसह राज्यातील १.१५ लाख जागेसाठी २.८५ लाख अर्ज प्राप्त झाले. दरम्यान मोफत प्रवेशापासून एकही पात्र बालक वंचित राहू नये म्हणून अर्ज करण्याला दोन दिवसाची अर्थात ४ मार्चपर्यंत शिक्षण विभागाकडून मुदतवाढ मिळाली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच दिव्यांग घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागेतून मोफत प्रवेश दिले जातात. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत २ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज आॅनलाईन पद्धतीने मागविण्यात आले होते. २ मार्चपर्यंत राज्यात १ लाख १५ हजार २९८ जागेसाठी २ लाख ८५ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये अकोला जिल्ह्यात २३३७ जागेसाठी ७२०३ अर्ज, अमरावती जिल्ह्यात २४८६ जागेसाठी ८९५२ अर्ज, बुलडाणा जिल्ह्यात २७८५ जागेसाठी ६४३४ अर्ज, वाशिम जिल्ह्यात १०११ जागेसाठी २२०४ अर्ज, यवतमाळ जिल्ह्यात १७०१ जागेसाठी ५८९५ अर्ज असे अमरावती विभागाील एकूण १०३२० जागेसाठी ३०६८८ अर्जांचा समावेश होता. दरम्यान प्रवेश अर्जापासून एकही पात्र बालक वंचित राहू नये म्हणून प्रवेश अर्ज सादर करण्याला शालेय शिक्षण विभागाकडून २ मार्च रोजी मुदतवाढ मिळाली असून, तशा सूचना जिल्हास्तरीय शिक्षण यंत्रणेला ३ मार्च रोजी इ-मेलद्वारे मिळालेल्या आहेत. त्यामुळे दोन दिवसात प्रवेश अर्जाच्या संख्येत वाढ होण्याचा आशावाद शिक्षण विभागाकडून वर्तविला जात आहे.