क्रांतिज्योत यात्रा पोहोचली १९0 गावांमध्ये!
By Admin | Updated: August 14, 2014 02:06 IST2014-08-14T01:52:03+5:302014-08-14T02:06:26+5:30
तुकडोजी महाराजांचे नाव थोर पुरूषांच्या यादीत हवेच.

क्रांतिज्योत यात्रा पोहोचली १९0 गावांमध्ये!
वाशिम : राष्ट्रभावना जागृतीसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत समावेश करण्याच्या मागणीला लोकचळवळ बनविण्यासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने ९ ऑगस्ट या क्रांतिदिनापासून विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये क्रांतिज्योत यात्रा काढली. या यात्रेने आतापर्यंत १९0 गावं पालथी घातली असून, लोकमतने प्रकाशझोतात आणलेल्या या मुद्यावर गुरूदेव भक्त सर्वत्र जनजागृती करीत आहेत.
वंदनीय तुकडोजी महाराजांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींनी राष्ट्रसंताची पदवी बहाल केली होती. ग्रामसमृद्धीच्या ग्रामगितेतून त्यांनी लोकसमृद्धीचा सर्वांग संदेश समाजाला दिला. त्याचाच आधार घेऊन राज्य शासनाने विविध योजना आणल्या. या महान राष्ट्रसंताच्या विचारांचा वारसा जपून, त्यांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत शासनाने समाविष्ट करावे, या मागणीसाठी गुरूदेव भक्तांनी जनजागरण सुरू केले आहे. लोकमतने हा मुद्दा प्रकाशझोतात आणल्यानंतर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवाधिकार्यांनी ९ ऑगस्टपासून क्रांतिज्योत यात्रा सुरू केली. विदर्भातील प्रमुख १९0 गावांमध्ये ही यात्रा काढून गुरूदेवभक्तांनी जनजागृती केली. या यात्रेचे मार्गक्रमण सुरूच असून, याद्वारे जगजागृती करण्याचा मानस गुरूदेवभक्तांनी व्यक्त केला.