महसूल विभागाने अवैध गौण खनिजप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई थांबवली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST2021-02-05T09:29:37+5:302021-02-05T09:29:37+5:30
वाशिम : उमरखेड (जि. यवतमाळ) येथील नायब तहसीलदारांवर रेती माफियाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध आणि विविध मागण्यांची पूर्तता होत ...

महसूल विभागाने अवैध गौण खनिजप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई थांबवली !
वाशिम : उमरखेड (जि. यवतमाळ) येथील नायब तहसीलदारांवर रेती माफियाने केलेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध आणि विविध मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत वाशिम जिल्ह्यात गौण खनिज अवैध वाहतूकप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याचा निर्णय तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने २७ जानेवारी रोजी घेतला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार, तलाठी गजानन सुरोशे हे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गेले असता, रेती माफियाने पवार यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा निषेध आणि रेती माफियांवर कठोर कारवाई तसेच विविध मागण्यांच्या पूर्ततेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संबंधित हल्लेखोरांविरूद्ध संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावे, जिल्हा गौण खनिज निधीमधून सर्व तालुक्यांना सशस्त्र सुरक्षारक्षक पुरविण्यात यावा, आदी मागण्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे बुधवारी केल्या. या मागण्यांची पूर्तता होत नाही; तोपर्यंत जिल्ह्यात गौण खनिज अवैध वाहतूकप्रकरणी महसूल विभागातर्फे २७ जानेवारीपासून कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याचा निर्णय तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, सचिव कैलास देवळे यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी दिले.