आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या आठवणींना उजाळा; शिरपूरात चातुर्मास तर कारंजात दिला होता उपदेश
By संतोष वानखडे | Updated: February 18, 2024 15:02 IST2024-02-18T15:01:36+5:302024-02-18T15:02:17+5:30
आचार्य विद्यासागरजी महाराज हे दार्शनिक साधू होते. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे.

आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या आठवणींना उजाळा; शिरपूरात चातुर्मास तर कारंजात दिला होता उपदेश
वाशिम : जगप्रसिद्ध जैन ऋषी आचार्य विद्यासागरजी महाराज यांचा रविवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने मृत्यू झाला. विद्यासागरजी महाराज यांनी वाशिम जिल्ह्यातील जैनांशी काशी म्हणून ओळख असलेल्या शिरपूर जैन (ता.मालेगाव) येथे सन २०२२ चा चातुर्मास यशस्वीरित्या केला होता तसेच कारंजात समाजबांधवांना मोलाचा उपदेश दिला होता. या आठवणींना उजाळा देताना जैन बांधवांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
आचार्य विद्यासागरजी महाराज हे दार्शनिक साधू होते. दीर्घकाळ ध्यानधारणा करण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी देशभरात पद यात्रा काढून समाजाचा प्रसार, प्रचार करत हजारो मुनींना दीक्षा दिली. यामध्ये तरुण उच्चशिक्षित देशविदेशातील तरुणांना उपदेश केला. जैनांशी काशी असलेल्या शिरपूरनगरीतदेखील सन २०२२ मध्ये त्यांनी चातुर्मास केला होता. शिरपूर येथील हा चातुर्मास त्यांचा प्रथम, अंतिम व ऐतिहासिक ठरला. चातुर्मासदरम्यान देश-विदेशातील हजारो भाविकांची दररोज शिरपूरनगरीत मांदियाळी असायची. शिरपूरनगरीत यात्रेचे स्वरुप आले होते. दुपारच्या सुमारास ते भाविकांना उपदेश व दर्शनदेखील द्यायचे. विद्यासागरजी महाराजांचे सहज व सुलभ दर्शन होत असल्याने भाविक हे स्वत:ला भाग्यवान समजायचे. विद्यासागरजी महाराज यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातील भाविकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. विद्यासागरजी महाराजांच्या जिल्ह्यातील आठवणींना उजाळा देताना भाविकांना गहिवरून आले.
मुसळधार पावसातही त्यांनी पदयात्रा थांबवली नाही...
मध्यप्रदेशातून शिरपूरनगरीत चातुर्मास करण्यासाठी त्यांचे जुलै २०२२ मध्ये जिल्ह्यात आगमन झाले होते. ३ जुलै २०२२ रोजी कारंजा तालुक्यातील विळेगाव फाट्याजवळ मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसातही आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी पदयात्रा थांबविली नव्हती, हे विशेष. पावसामुळे महाराज ओलेचिंब होऊ नये म्हणून भाविकांनी ताडपत्री डोक्यावर धरून पदयात्रा सुरूच ठेवली होती.