आॅक्सिजन सोडा; साधा जनरेटर, कुलरही नाही; केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST2021-04-26T04:37:25+5:302021-04-26T04:37:25+5:30
वाशिम : जिल्ह्यातील सरकारी कोविड केअर सेंटरमघ्ये आॅक्सिजनची व्यवस्था तर दूरच; साधा जनरेटर, कुलरही नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडीत ...

आॅक्सिजन सोडा; साधा जनरेटर, कुलरही नाही; केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम !
वाशिम : जिल्ह्यातील सरकारी कोविड केअर सेंटरमघ्ये आॅक्सिजनची व्यवस्था तर दूरच; साधा जनरेटर, कुलरही नसल्याने उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडीत झाला तर रुग्ण घामाघूम होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारी कोविड केअर सेंटरची संख्याही वाढविण्यात येत आहे. समाजकल्याण विभागांतर्गत असलेली वसतिगृहे, निवासी शाळा या कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेतल्या असून, येथे खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाशिम शहरात सिव्हिल लाईनस्थित मुलींचे वसतिगृह व सुरकंडी रोड येथील निवासी शाळा, रिसोड तालुक्यातील सवड येथील निवासी शाळा व वसतिगृह, मंगरूळपीर, मानोरा येथेही कोविड केअर सेंटर आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये आॅक्सिजन बेडची व्यवस्था नाही. आॅक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीमधील जिल्हा कोविड हॉस्पिटल, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगिकरण कक्षात हलविण्यात येते. कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पारा चांगलाच चढत आहे. त्यामुळे कुलरची आवश्यकता भासते. मात्र, कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी कुलरची कोणतीही व्यवस्था नाही. वीजपुरवठा खंडीत झाला तर जनरेटरचीही व्यवस्था नाही. रुग्णांसाठी पंखे आहेत. वीजपुरवठा खंडीत झाला तर रुग्णही घामाघूम होत असल्याचे दिसल्याचे काही रुग्णांनी सांगितले. ही गैरसोय टाळण्यासाठी किमान जनरेटर, कुलरची व्यवस्था करावी, असा सूर रुग्णांमधून उमटत आहे.
००
उकाड्याचा अधिक त्रास
कोट
मी सुरकंडी रोडस्थित कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहे. येथे निर्जंतुकीकरण व स्वच्छता नियमित केली जाते. मात्र, जनरेटर व कुलरची व्यवस्था नाही. पंख्यांची व्यवस्था असल्याने उकाड्यापासून थोडा दिलासा मिळतो. दुपारच्या वेळी जास्त घामाघूम होते. एका खोलीत किमान एक कुलरची व्यवस्था करावी.
- एक रुग्ण
.............
मी वाशिम येथील सिव्हिल लाईनस्थित कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहे. येथील खिडक्यांची दुरवस्था, काचा फुटलेल्या आहेत. कुलरची कोणतीही व्यवस्था नसल्याने दुपारच्या वेळी उकाडा असह्य होतो. यामधून सुटका करण्यासाठी कुलर, जनरेटरची व्यवस्था असायला हवी.
- एक रुग्ण
००००
एप्रिल तापला
मार्च महिन्यात कमाल व किमान तापमानात फारशी वाढ नव्हती. मार्च महिन्यात सरासरी कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सियसदरम्यन होते. एप्रिल महिन्यात सुरूवातीपासूनच उन्हाचा पारा चढत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
०००
एकूण कोविड केअर सेंटर ०६
दाखल रुग्ण ४५०