वाशिम जिल्ह्यात २५४ ऊसतोड कामगारांची नोंदणी, विविध योजनांचा लाभ मिळणार!
By संतोष वानखडे | Updated: April 19, 2023 14:53 IST2023-04-19T14:53:05+5:302023-04-19T14:53:26+5:30
आतापर्यंत २५४ उसतोड कामगारांनी नोंदणी केली असून, १५ जणांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.

वाशिम जिल्ह्यात २५४ ऊसतोड कामगारांची नोंदणी, विविध योजनांचा लाभ मिळणार!
वाशिम : शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. आतापर्यंत २५४ उसतोड कामगारांनी नोंदणी केली असून, १५ जणांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
असंघटित कामगारांमध्ये उसतोड कामगारही येतात. इतर असंघटित कामगारांप्रमाणे ऊसतोड कामगारही दारिद्र्य, बेरोजगारी, कनिष्ठ दर्जाचे राहणीमान याच्या दुष्टचक्रात सापडल्याचे आढळते. राज्यात जवळपास १२५ पेक्षा अधिक साखर कारखाने सुरू आहेत. ऊस तोडणी करून या कारखान्यांना त्याचा पुरवठा करण्याचे काम ऊसतोड कामगार करतात. जिल्ह्यात एकही साखर कारखाना नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसतोड कामगार हे कामासाठी परजिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे धाव घेतात.
उसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे, असा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत असून, नोंदणी केलेल्या कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभही दिला जात आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळावा, याकरीता शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत उसतोड कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. आतापर्यंत २५४ उसतोड कामगारांनी नोंदणी केली.