कारंजातून आमदारकीसाठी महसूल राज्यमंत्र्यांनीही दर्शविली तयारी!

By Admin | Updated: July 3, 2017 02:32 IST2017-07-03T02:32:16+5:302017-07-03T02:32:16+5:30

नवख्यांना अप्रत्यक्ष इशारा : कारंजात झाली पत्रकार परिषद

Regarding revenue from the fountain, the ministers of the state are ready to show! | कारंजातून आमदारकीसाठी महसूल राज्यमंत्र्यांनीही दर्शविली तयारी!

कारंजातून आमदारकीसाठी महसूल राज्यमंत्र्यांनीही दर्शविली तयारी!



लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा-मानोरा मतदारसंघात शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या जरी मोठ्या प्रमाणात असली, तरी ऐनवेळी चुरस निर्माण झाली, तर मी शिवसेनेचा उमेदवार राहू शकतो, असे म्हणत विद्यमान महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी कारंजातून आमदारकीसाठी तयारी दर्शविली आहे. यायोगे त्यांनी नव्यानेच शिवसेनेत प्रवेश घेतलेल्यांना एकप्रकारे इशारा दिल्याने इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेच्यावतीने रविवार, २ जुलै रोजी कारंजात रोगनिदान शिबिर व मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तद्नंतर आयोजित पत्रकार परिषदेत महसूल राज्यमंत्र्यांनी वरील विधान केले. कारंजा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे बळकटीकरण होईल का, या प्रश्नावर संजय राठोड म्हणाले, की प्रकाश डहाके यांनी शिवसेनेत अद्याप अधिकृत प्रवेश घेतलेला नाही. तसेच याबाबत मलादेखील कुठलीच ठोस माहिती नसल्याचे ते म्हणाले.
आगामी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता शिवसेनेकडे उमेदवारी मागण्यासाठी डॉ. श्याम जाधव, डॉ.सुभाष राठोड, डॉ.महेश चव्हाण यांची सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून चढाओढ सुरू आहे. तसेच इतर पक्षांमधील अनेक दिग्गज नेते देखील शिवसेनेत प्रवेश घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चितपणे कुणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला असता, ना. संजय राठोड म्हणाले, की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर पूर्णत: विश्वास आहे. त्यामुळे जर कारंजा मतदारसंघात उमेदवारांमध्ये जास्तच चढाओढ झाली, तर पक्ष मला देखील उमेदवारी देऊन निवडणूक लढण्याचा आदेश देऊ शकते. त्यासाठी आपण तयार आहोत, असे संजय राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला डॉ.श्याम जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश पाटील, डॉ.सुभाष राठोड, दिनेश राठोड, नरहरी कडू, गणेश बाबरे, विवेक नाकाडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Regarding revenue from the fountain, the ministers of the state are ready to show!