शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:59 IST2017-11-15T01:59:19+5:302017-11-15T01:59:31+5:30

गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या चमूंनी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हय़ातील २५ गावांना भेटी देत जनजागृती करण्यात आली.

'Red sticker' on non-toilets house | शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’

शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’

ठळक मुद्देएकाच दिवशी २५ गावांत जिल्हा परिषद चमूंची धडक 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष अभियान हाती घेतले असून, शौचालय नसलेल्यांच्या घरावर ‘लाल स्टिकर’ लावून धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या चमूंनी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हय़ातील २५ गावांना भेटी देत जनजागृती करण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी शौचालय बांधकामांना गती देणे यासाठी जिल्हा परिषदेतर्फे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सामूहिक माध्यमातून गावोगावी भेटी देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबीयांशी संवाद साधणे आणि शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन करणे, असा हा उपक्रम सुरू आहे. वारंवार सूचना, विनंती करूनही शौचालय न बांधणार्‍या नागरिकांच्या घरावर आता ‘लाल स्टिकर’ लावून निर्वाणीचा इशारा दिला जात आहे. आता काही मोजक्या नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधकाम केले नसल्याने गाव हगणदरीमुक्त होणार नाही. पर्यायाने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीपासून त्या-त्या गावांना वंचित राहण्याची वेळ येऊ शकते, याची माहिती गावपातळीवर दिली जात आहे. स्वच्छता राखणे, महिलांची प्रतिष्ठा जपणे आणि गावविकासासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी मिळविणे आदीसंदर्भात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. 
गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा स्वच्छता व पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, नितीन माने पाटील आदींनी केले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी मंगळवारी वाशिम तालुक्यातील पंचाळा, सुरकंडी खुर्द, सुरकंडी बु., येथे भेटी देऊन शौचालय बांधकाम व वापराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी वाघ, सहायक गटविकास अधिकारी वानखेडे, पंचाळा सरपंच सुरेखा डुबे, उपसरपंच हनुमान मोरे, सदस्य केशव इंगोले, इमामभाई दर्गीवाले, यशोदा मोरे, साहेबराव इंगोले, सतीश डुबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. 
-

Web Title: 'Red sticker' on non-toilets house