वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 06:29 PM2019-07-02T18:29:04+5:302019-07-02T18:29:11+5:30

मानोरा तालुक्यातील आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आला तर मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड, शिरपूर, दुधाळा परिसरातील शेती जलमय झाली.

Rainfall in Washim district! | वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस कोसळला असून, मानोरा व मालेगाव तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. मानोरा तालुक्यातील आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आला तर मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड, शिरपूर, दुधाळा परिसरातील शेती जलमय झाली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास वाशिम शहर परिसरातही धो-धो पाऊस झाला. जिल्ह्यातील काही गावांमध्ये ओढवलेल्या पुरामुळे शेतजमिनी खरडून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. मानोरा तालुक्यात शेवटच्या टोकावर असलेल्या आमकिन्ही परिसरात २ जुलै रोजी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील नाल्याला पूर आला. त्यामुळे काही वेळेसाठी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. तीन दिवसांपूर्वी आमकिन्ही गावानजीकच असलेल्या ज्योतिबानगर येथे वीज पडल्यामुळे बैलजोडी ठार झाली होती. मंगळवारी पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकºयांसह शेतमजुरांनी शेतातून घराचा रस्ता धरला. आमकिन्ही परिसरातील नाल्याला पूर आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती. सुरूवातीपासूनच आमकिन्ही परिसरात धो-धो पाऊस बरसत आहे तर हळदा, जगदंबानगर, कोलार, साखरडोह परिसरात शेतकºयांनी अल्पशा पावसाच्या भरवशावर पेरण्या आटोपल्या आहेत.
मालेगाव तालुक्यातील किन्हीघोडमोड, वसारी, दापूरी, शिरपूर व दुधाळा परिसरातही दमदार पाऊस झाला. मालेगाव ते हिंगोली या ४६१ बी क्रमांकाच्या महामार्गाच्या कामांमध्ये शिरपूर ते दुधाळा दरम्यान श्रीराम बळी यांच्या शेताजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे पाण्याचा प्रवाह बंद झाला. परिणामी, पावसाचे पाणी परिसरातील शेतांमध्ये घुसले. यामध्ये मालेगाव येथील श्रीराम बळी यांच्या विहिर, शेततळ्याचे व ८ एकर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाळा सुरू होऊनही संबंधित कंत्राटदाराने कामात दिरंगाई केल्याने शेतकºयांवर ही वेळ ओढवली आहे. या नुकसानाबद्दल संबंधित कंत्राटदाराविरूद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली.

Web Title: Rainfall in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.