वाशिममध्ये पावसाचे पाणी घरात घुसले; सोयाबीनसह धान्य भिजले
By संतोष वानखडे | Updated: September 24, 2023 16:13 IST2023-09-24T16:12:24+5:302023-09-24T16:13:30+5:30
गेल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात कामरगाव परिसरात पाऊस येत आहे. दुपारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने गावकऱ्यांची एकच धांदल उडाली.

वाशिममध्ये पावसाचे पाणी घरात घुसले; सोयाबीनसह धान्य भिजले
वाशिम : कामरगाव परिसरात (ता.कारंजा) दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस बरसला आणि या पावसाचे पाणी शेतकऱ्याच्या घरात घुसल्याने सोयाबीनसह इतर धान्य भिजले.
गेल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात कामरगाव परिसरात पाऊस येत आहे. दुपारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने गावकऱ्यांची एकच धांदल उडाली. दरम्यान, कामरगाव येथील श्याम काकानी यांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने घरातील सोयाबीनसह अन्य धान्य पाण्यात भिजले. यामुळे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
काकानी यांचे घर मुख्य रस्त्यावर असून या रस्त्याच्या कडेला स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सांडपाण्याची नाली न बांधल्याने हे पावसाचे पाणी घरात घुसल्याचा आरोप काकानी यांनी केला. यासंदर्भात काकांनी यांनी वारंवार स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला विनंती केली. तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर पावसाचे पाणी घरात घुसले आणि सोयाबीनसह इतर धान्य पाण्यात भिजले.