ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालये झालीत शोभेची वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST2021-09-14T04:48:16+5:302021-09-14T04:48:16+5:30
ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचाव्यात या उद्देशाने शासनाच्या वतीने सार्वजनिक ...

ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालये झालीत शोभेची वास्तू
ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहाेचाव्यात या उद्देशाने शासनाच्या वतीने सार्वजनिक वाचनालये सुरू केली .मात्र अनेक गावामध्ये वाचनालयाच्या नावाचा साधा नामफलक सुद्धा नसल्याने वाचकात गावात वाचनालय आहे की नाही या बाबत साशंकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे अनेक वाचनालयात नियमित वर्तमानपत्रे येत नसून केवळ महिना भरल्यानंतर दोन चार वर्तमानपत्र महिनाभराची रद्दी एकदाच खरेदी करून वाचनालयात दाखविण्यात येत असल्याने वाचकांना वर्तमान पत्रातून दैनंदिन नियमित मिळणाऱ्या घडामोडीपासून वंचित रहावे लागत आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांचे ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयाकडे विशेष दुर्लक्ष करून तपासणीच्या नावाखाली केवळ वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील वाचकांना पुस्तके तथा वर्तमान पत्र वाचनापासून वंचित रहावे लागत आहे.
-----------------
उंबर्डा येथे शांतता समितीची बैठक
उंबर्डा बाजार : स्थानिक पोलीस चौकीत गणेश उत्सवानिमित्त कारंजाचे ठाणेदार गजानन धंदर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पटेल यांचे उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
शांतता समितीच्या बैठकीचे प्रास्ताविक पोलीस पाटील उमेश देशमुख यांनी केले. बैठकीला पोलीस उपनिरीक्षक पटेल यांनी मार्गदर्शन केले. संचलन जमादार विलास गायकवाड तर आभार विनोद राठोड यांनी मानले . या बैठकीला मुरलीधर उगले , अजित देशमुख , वहिदभाई , विनोद चव्हाण, बाळू चव्हाण, गौरव देशमुख, धनराज इंगोले ( टेलर ) यांचे सह गजानन लायबर उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी पिंपळे , महल्ले आदींनी परिश्रम घेतले.
----
स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरवस्था
उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे येवता येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरवस्था झाली असून स्मशानभूमी शेड व रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
येवता ते यावर्डी या रस्त्यावर स्मशानभूमी असून काही महिन्यांपूर्वी खडीकरण झालेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्यावर स्मशानभूमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच स्मशानभूमी शेडची सुद्धा दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्याच्या दिवसात पाणी टपकत असल्याने शेडचा निवारा निकामी ठरत आहे.
तरी संबंधित विभागाने येवता येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.