पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये समस्यांचा भडिमार; औषधीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 13:47 IST2019-08-18T13:46:49+5:302019-08-18T13:47:10+5:30
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये इतरही विविध समस्या निर्माण झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.

पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये समस्यांचा भडिमार; औषधीचा तुटवडा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आॅगस्ट, सप्टेंबर या महिन्यात गुरांना प्रामुख्याने घटसर्प, फऱ्या आजारांची लागण होते. त्यापासून गुरांचा बचाव करण्यासाठी लसीकरण मोहिम राबविणे आवश्यक आहे. असे असताना जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये या मोहिमेस अद्यापपर्यंत सुरूवातच झाली नसून औषधीचा देखील तुटवडा जाणवत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये इतरही विविध समस्या निर्माण झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत.
वाशिम येथे जिल्हा पशु सर्व चिकित्सालय कार्यान्वित असून मंगरूळपीर, कारंजा आणि रिसोड या शहरांमध्ये तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आणि ५८ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणारे पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून गुरांच्या आरोग्याची निगा राखणे, त्यांना जडणाºया आजारांचे निदान करून योग्य औषधोपचार करण्यासह वेळोवेळी लसीकरण मोहिम राबविणे क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा पशु सर्व चिकित्सालयासह लघू पशुवैद्यकीय चिकित्सालये व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मंजूर असलेल्या जेमतेम १७ पशुधन विकास अधिकाऱ्यांपैकी ७ पदे रिक्त असून दोघांची बदली झाल्याने कामकाज वारंवार प्रभावित होत आहे. पशुधन पर्यवेक्षकांचीही अनेक पदे रिक्त असल्याने जनावरांच्या आरोग्याची निगा राखणे अशक्य होत असून उद्भवलेल्या असुविधांमुळे पशुपालक अक्षरश: जेरीस आले आहेत. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारत परिसरातही सर्वत्र घाण आणि निरूपयोगी झाडे उगवल्याचे दिसून येत आहे.
३० हजार लसी प्राप्त; पण मोहिम थंडबस्त्यात
पावसाळ्यात जनावरांना प्रामुख्याने घटसर्प आणि फºया या आजारांची लागण होते. वेळीच निदान होऊन लस आणि योग्य औषधोपचार न मिळाल्यास या आजारात जनावराचा मृत्यू देखील ओढवू शकतो. त्यानुषंगाने जिल्ह्याला ३० हजार लसी प्राप्त झाल्या आहेत; पण अपुºया मनुष्यबळामुळे मोहिम थंडबस्त्यात आहे.
१४ हजार पशूधनाच्या आरोग्याची जबाबदारी असलेलया शिरपूर पशुवैद्यकीय केंद्रात सुविधा मिळत नसल्याने नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. पशुवैद्यकीय केंद्रात गत महिनाभरापासून औषधीचाही तुटवडा जाणवत आहे. प्रशासनाने शिरपूरला कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी देण्यासोबतच उद्भवलेल्या समस्या दुर कराव्या.
- विजय कदम
पशुपालक, शिरपूर जैन (ता.मालेगाव)
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये गत काही दिवसांपासून निश्चितपणे औषधीचा तुटवडा होता; मात्र आता हा प्रश्न निकाली निघाला असून औषधीचा पुरवठा केला जात आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यास घटसर्पच्या ६ हजार लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुलनेने अपुरे मनुष्यबळ असतानाही चोख सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. व्ही.एन. वानखडे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, वाशिम