पिककर्ज वितरणात चलन तुटवड्याची अडचण
By Admin | Updated: April 11, 2017 21:19 IST2017-04-11T21:19:04+5:302017-04-11T21:19:04+5:30
बँंकाना कर्ज वितरण करताना रोखीची अडचण येत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात येत असली तरी, शेतकऱ्यांना तो पैसा एटीएममधून काढावा लागत आहे

पिककर्ज वितरणात चलन तुटवड्याची अडचण
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामासाठी पिककर्ज वितरणाला प्रारंभ झाला आहे; परंतु बँंकाना कर्ज वितरण करताना रोखीची अडचण येत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात येत असली तरी, शेतकऱ्यांना तो पैसा एटीएममधून काढावा लागत आहे; परंतु बँकांकडे एटीएममध्ये टाकण्यास पुरेशी रक्कमच नसल्याने शेतकरी आणि बँकांची मोठी पंचाईत झाली आहे. प्रामुख्याने अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेला या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेला चलन तुटवडा अद्यापही लोकांना त्रस्त करीत आहे. त्यावर पर्याय म्हणून कॅशलेस व्यवहारांवर भर देण्यात येत असला तरी, त्यामुळे समस्या सुटू शकत नसल्याचे दिसते. सद्यस्थितीत खरीप हंगामासाठी बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध बँकांचे एकूण १ लाख ९८ हजार ५४० शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ लाख ६२ खातेदार पिककर्जासाठी पात्र आहेत. यावर्षी सर्व बँका मिळून ११५० कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वितरित करणार आहेत. पिककर्जाची रक्कम रोखीने न देता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारी अकोला जिल्हा मध्सवर्ती बँक शेतकऱ्यांच्या रूपे केसीसी कार्डवर पैसे जमा करीत आहे. आता ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या एटीएममधून काढावी लागते आणि एटीएममध्ये टाकण्यासाठी बँकेकडे पुरेसे पैसेही नाहीत. बँकेच्या वाशिम येथील मुख्य शाखेला त्यांच्या दिवसभराच्या व्यवहारासाठी १० लाख रुपये मिळतात. यातील काही रक्कम त्यांना एटीएममध्ये टाकावी लागते. त्यातच त्यांच्या एटीएममध्ये केवळ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाच टाकणे शक्य असून, त्यांना स्टेट बँकेकडून मिळणाऱ्या १० लाखाच्या रकमेत सर्वच नोटांचे कमी अधिक प्रमाण असते. त्यातही एटीएममध्ये पैसे टाकून काऊंटरवर विड्रॉलसाठी त्यांना रक्कम हाती ठेवावी लागते. हीच स्थिती इतरही बँकांची असल्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात बॅकांना अप्रत्यक्ष अडचणी येतच असल्याचे दिसते.
आम्हाला दिवसभराच्या व्यवहारासाठी १० लाख रुपयांची रक्कम मिळते. यामधील काही रक्कम एटीएममध्ये टाकून काऊंटरवर वाटपासाठी काही रक्कम हाताशी ठेवावी लागते. त्यातच शेतकऱ्यांच्या रुपे कार्डमध्ये पिककर्ज जमा केले तरी, त्यांना एटीएममधूनच पैसे काढावे लागतात.
- व्ही. एस. सरनाईक, व्यवस्थापक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँंक, मुख्य शाखा वाशिम