साेयाबीनचे दर दहा हजारांवर; फायदा मात्र व्यापाऱ्यांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:13+5:302021-07-31T04:41:13+5:30
मंगरुळपीर : सध्या सोयाबीनच्या दरात विक्रमी भाववाढ झाली आहे. सोयाबीनचे दर पहिल्यांदा १० हजार रुपायांच्या जवळपास पाेहोचले आहेत. ...

साेयाबीनचे दर दहा हजारांवर; फायदा मात्र व्यापाऱ्यांनाच
मंगरुळपीर : सध्या सोयाबीनच्या दरात विक्रमी भाववाढ झाली आहे. सोयाबीनचे दर पहिल्यांदा १० हजार रुपायांच्या जवळपास पाेहोचले आहेत. मात्र याचा लाभ शेतकऱ्यांना होत नसून, शेतकऱ्यांनी आधीच सोयाबीन विकल्याने व्यापाऱ्यांनाच लाभ होतो आहे.
गेल्या खरीप हंगामात असलेल्या हमीभावापेक्षा दुपटीने ही वाढ झाल्याने आणि आता एकाही शेतकऱ्याच्या घरी सोयाबीनचा दाणाही शिल्लक नसल्याने सोयाबीनची झालेली विक्रमी तेजी सध्या शेतकरी वर्गात चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या खरिपाच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांना सोयाबीन तीन ते चार हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे विकावे लागले. नंतर शासकीय खरेदी सुरू झाली, तेव्हा हमीभावापेक्षा काही प्रमाणात जादा भाव मिळाला. तेव्हा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. नंतर आणखी तेजी आली, ती खास करून व्यापारी वर्गाला फायद्याची ठरली. फेब्रुवारीपासून तर सोयाबीनची बाजार समितीत आवकच घटली होती. तेव्हा मोजक्याच शेतकऱ्यांना या झालेल्या भाववाढीचा लाभ झाला. आता दर प्रचंड वाढलेले असताना शेतकऱ्यांकडे सोयाबीनच नसल्याने ज्या व्यापाऱ्यांनी साठा केलेला आहे, त्यांना मात्र मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.