वाशिम जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 15:09 IST2018-08-10T15:08:31+5:302018-08-10T15:09:33+5:30
वाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार झाला असून, १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला.

वाशिम जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार झाला असून, १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला.
येत्या डिसेंबर महिन्यात विद्यमान सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव हा अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या आरक्षणासह जिल्हा निवडणूक विभागाने तयार केला. सन २०११ च्या जनगणनेच्या अनुषंगाने वाशिम तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ वाढला असून, पूर्वीच्या नऊ मतदारसंघातील एक, दोन गावे वगळून दहाव्या नवीन मतदारसंघाची रचना करण्यात आली. पूर्वीच्या काही जिल्हा परिषद मतदारसंघाची नावे ‘जैसे थे’ असून, दहावा नवीन मतदारसंघ कोणता? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
लोकसंख्या व चक्रानुक्रमानुसार एससी, एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासह जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव ९ आॅगस्ट रोजी तहसिल कार्यालयांनी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, १० आॅगस्टला जिल्हाधिकाºयांनी सदर प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला. प्रारुप मतदारसंघ रचनेच्या या प्रस्तावास २० आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडून मान्यता देण्यात येणार आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोग कामाला लागला असून, राजकीय पक्षांच्या हालचालींनादेखील वेग आल्याचे दिसून येते. केंद्र, राज्यात सत्ता असल्याचा लाभ उचलत जिल्हा परिषदेतदेखील सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपातर्फे जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. शिवसेनेनेदेखील मतदारसंघनिहाय तयारी चालविली असून, तुर्तास शिवसेना-भाजपा युतीबाबत हालचाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. काँग्रेसनेदेखील सत्ता कायम ठेवण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला असून, समविचारी पक्षांसोबत युती करण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय आढावा घेत उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याने ग्रामीण भागातील राजकारण तापण्यास सुरूवात झाल्याचे मानले जात आहे. ‘सोशल इंजिनिअरिंग’ची हाक देत भारिप-बमसंनेदेखील निवडणुकीच्या मैदानात उतरत इतर चार प्रमुख पक्षांचे लक्ष वेधून घेतले आहे. गतवर्षीच्या वाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीपासून अन्य पक्षही भारिप-बमसंचे ‘राजकीय’ महत्त्व जाणून असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत आहेत.