‘वॉटर कप’ २०१९ ची तयारी; विळेगाव, बोरव्ह्यात प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 17:41 IST2019-02-09T17:41:22+5:302019-02-09T17:41:36+5:30
वाशिम: पाणी फाऊंडेशनच वॉटर कप २०१९ ची तयारी सुरू झाली आहे. येत्या ८ एप्रिलपासून सुरू होणाºया या स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींची तीन पथके जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

‘वॉटर कप’ २०१९ ची तयारी; विळेगाव, बोरव्ह्यात प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पाणी फाऊंडेशनच वॉटर कप २०१९ ची तयारी सुरू झाली आहे. येत्या ८ एप्रिलपासून सुरू होणाºया या स्पर्धेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींची तीन पथके जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी कारंजा तालुक्यातील विळेगाव येथे दारव्हा येथील एक पथक दाखल झाले असून, प्रशिक्षणाला सुरूवातही झाली आहे.
पाणी फाऊंडेशनच्या तिसºया पर्वातील वॉटर कप २०१९ ही स्पर्धा राज्यातील ७६ तालुक्यांत राबविली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या तालुक्यातील हजारो गावांनी अर्जही भरुन दिले असून, स्पर्धेसाठी प्रत्येक गावातील पाच प्रशिक्षणार्थींची निवडही करण्यात आली आहे. या प्रशिक्षणार्थींना पाणी फाऊंडेशनच्यावतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात गतवर्षी तालुकास्तरावर विजेते ठरलेल्या गावांत प्रशिक्षणाची तयारी करण्यात आली असून, यात कारंजा तालुक्यातील विळेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा गावाचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा, कळंब आणि उमरखेड येथील प्रशिक्षणार्थींची पथके येणार आहेत. त्यापैकी कारंजा तालुक्यातील विळेगाव येथे दारव्हा येथील पथक दाखल झाले असून, त्यांच्या प्रशिक्षणास सुरुवातही झाली आहे, तर येत्या आठवड्यात बोरव्हा येथे कळंब आणि उमरखेड येथील पथके दाखल होणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील ८ पथके प्रशिक्षणासाठी येणार असून, प्रत्येक पथकात ५० प्रशिक्षणार्थींचा सहभाग असणार आहे. एका पथकासाठी चार दिवसांचे प्रशिक्षण राहणार असून, ही मंडळी पाणलोटाचे विविध उपचार, माथा ते पायथा उपचार करण्याचे महत्व, पावसाचे पाणी गावातच अडवून जमिनीत कसे मुरविले जाईल आदिंबाबत विविध कृतीगीत, खेळ, प्रत्यक्ष उपचार व मनोरंजनाच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. या प्रशिक्षणार्थींना पाणी फाऊंडेशनचे विदर्भ मास्टर हेड सुमित गोरले यांच्या मार्गदर्शनात कारंजा तालुक्यातील खेर्डा येथील मास्टर ट्रेनर जीवन गावंडे खेर्डा, सामाजिक प्रशिक्षक सीमा ताकसांडे, तांत्रिक प्रशिक्षक बनसोड आणि तांत्रिक सहाय्यक मार्गदर्शन करणार आहेत. विळेगाव येथे दारव्हा तालुक्यातील प्रशिक्षणार्थी विळेगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांचे मिरवणूक काढून, पाय धुऊन, बँड पथकाच्या गजरात स्वागत करण्यात आले. गावच्या सरपंच माला संजय घुले, तसेच ग्रामसचिव वडते यावेळी उपस्थित होते.