पॉस मशिनने अनुुदानित खतविक्रीचा बोजवारा
By Admin | Updated: June 1, 2017 20:23 IST2017-06-01T20:03:33+5:302017-06-01T20:23:35+5:30
प्रशिक्षणाचा अभाव: कृषीसेवा केंद्रधारकही अडचणीत

पॉस मशिनने अनुुदानित खतविक्रीचा बोजवारा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: शासनाने यंदापासून पॉस मशिनद्वारे अनुदानित खतांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. या प्रकियेला १ जूनपासून सुरुवात झाली; परंतु ही मशिन हाताळण्यासाठी पुरेसे प्रशिक्षणच कृषीसेवा केंद्रधारकांना मिळाले नसल्याने पहिल्याच दिवशी या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील पाचही कृषी सेवाकेंद्रांवर पॉस मशिनच्या वापराअभावी अनुदानित खतांची विक्री होऊ शकली नाही.
राज्य शासनाने अनुदानित खतांच्या विक्रीतील संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी यंदापासून पॉस मशिनने शेतकऱ्यांना अनुदानित खतांचे वितरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील कृषीसेवा केंद्रधारकांना या मशिन वापरण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण १६ आणि २७ मे रोजी देण्यात आले. तथापि, २७ मे रोजी झालेल्या प्रशिक्षण शिबिरात तांत्रिक कारणांमुळे आलेल्या अडचणीने अनेक कृृषीसेवा केंद्रधारकांना मशिनच्या वापराचे आवश्यक तंत्र कळू शकले नाही. त्यामुळे १ जूनपासून पॉस मशिनने खतविक्री काही दुकानदारांना सुरू करता आली नाही. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे १३ पैकी पाच दुकानांत ही मशिन देण्यात आली असली तरी, संबंधित कृषीसेवा केंद्रधारकांना मशिन हाताळणे जमत नसल्याने त्यांनी १ जून रोजी अनुदानित खतांची विक्रीच केली नाही. या मशिनच्या हाताळणीसाठी आणखी योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी ते करीत आहेत.