पोलीस लाईफ; ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:10+5:302021-02-05T09:24:10+5:30
वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात ५० वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची निर्मिती झाली. काही कर्मचाऱ्यांनी स्वत: खर्च करून ...

पोलीस लाईफ; ना ड्युटीची वेळ, ना पगाराचा मेळ!
वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात ५० वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची निर्मिती झाली. काही कर्मचाऱ्यांनी स्वत: खर्च करून डागडुजी केल्याने त्यांची घरे सुस्थितीत दिसून येतात; मात्र बहुतांश घरांची आजमितीस पडझड झालेली आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंब तर टिनपत्र्याच्या घरांमध्ये वास्तव्यास असल्याचे पाहावयास मिळत आहे. निवासस्थान परिसरात घरांमधील आणि शौचालयांमधील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी सुटली आहे. माकडांच्या उच्छादाने पोलीस कर्मचाऱ्यांची कुटुंबीय त्रस्त आहेत. अनेक घरांमध्ये आजही पाण्याची व्यवस्था पोहोचलेली नाही. अशाप्रकारच्या अनेकविध प्रश्नांमुळे पोलीस कर्मचारी कुटुंबे मिळणाऱ्या थोड्याथोडक्या पगारातून मुलांचे शिक्षण व घरखर्च भागत नसल्याने बाहेर वास्तव्य करणे जमत नाही, असे काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी बोलून दाखविले.
..................
ड्युटी किती तासाची?
पोलीस कर्मचाऱ्यांना तशी १२ तासांची ड्युटी ठरवून देण्यात आली आहे; मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळ कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर राहावे लागते.
.............
कुटुंबासाठी किती वेळ?
ठराविक तासांची ‘ड्युटी’ आटोपल्यानंतर इतर सर्व विभागांचे कर्मचारी घरी परततात; मात्र पोलिसांना १२ तासाच्या ड्युटीनंतरही घरी परतता येत नाही. त्यामुळे कुटुंबासाठी फार कमी वेळ मिळतो.
.................
मुलांचे शिक्षण कसे?
अधिकांश पोलीस कर्मचाऱ्यांचे पाल्य १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पोलीस होण्याची मनिषा बाळगतात. उच्चशिक्षणाचा खर्च झेपावत नसल्याने अर्ध्यावरच शिक्षण सोडणारेही अनेकजण आहेत.
.................
स्वत:चे घर नाहीच
मिळणाऱ्या कमी पगारातून घरखर्च, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न यासाठी पैसे राखून ठेवत असताना स्वत:चे घर उभारणे अशक्य ठरत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
.................
कोट :
वाशिम पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या निवासस्थान परिसरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नाही. घराचे, शौचालयांचे दरवाजे तुटल्यानंतरही कोणी पाहायला येत नाही. पाण्याचा प्रश्न अद्यापपर्यंत निकाली निघालेला नाही. यामुळे फार त्रास सहन करावा लागत आहे.
- संजीवनी बोंबे, वाशिम