प्रसादातून विषबाधा; मुलीचा मृत्यू, दोघींवर उपचार, उमरी खुर्द येथील घटना
By संतोष वानखडे | Updated: October 2, 2023 16:19 IST2023-10-02T16:18:54+5:302023-10-02T16:19:24+5:30
उमरी खुर्द येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने २७ सप्टेंबरला सायंकाळी प्रसाद वाटप करण्यात आला

प्रसादातून विषबाधा; मुलीचा मृत्यू, दोघींवर उपचार, उमरी खुर्द येथील घटना
वाशिम : श्रीक्षेत्र उमरी खुर्द (ता.मानोरा) येथील एका कार्यक्रमादरम्यान २७ सप्टेंबरला सायंकाळी आयोजित प्रसादाचा लाभ घेतलेल्या भाविकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. उपचारादरम्यान २ ऑक्टोबर रोजी पूनम रमेश पवार (९) हिचा यवतमाळ येथे मृत्यू झाला तर मृतकाची बहीण करिष्मा रमेश पवार व आकांक्षा अजित पवार यांचेवर दिग्रस येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उमरी खुर्द येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने २७ सप्टेंबरला सायंकाळी प्रसाद वाटप करण्यात आला. प्रसाद खाल्यानंतर ६० ते ७० नागरिक व लहान मुलांना मळमळ, उलटी व शौचास लागल्याने २८ सप्टेंबरला पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य पथकाने गावात दाखल होवून तातडीने उपचार सुरू केले. या रुग्णांपैकी पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने दिग्रस येथे हलविण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत तिसरीत शिक्षण घेणारी पूनम रमेश पवार हिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये भरती केले तर आकांक्षा अजित पवार (२३) व करिष्मा रमेश पवार (१५) यांच्यावर दिग्रस येथील खाजगी रुग्णालय मध्ये उपचार सुरु आहेत.
गोकुळ राठोड यांचा मुलगा व रमेश पवार यांचेवर पुसद येथे उपचार सुरु आहेत. चारही रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पूनम पवार या मुलीच्या उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले; परंतू, उपचारादरम्यान २ आक्टोबररात्री १ वाजतादरम्यान तिचा मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला.
उमरी येथे आरोग्य पथक
विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक उमरी येथे गत तीन दिवसांपासून तळ ठोकून आहे. गावातील ६० ते ७० रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. इतर रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ अनिरुद्ध जाधव यांनी दिली.