Plenty of water boosts fishing business in washim district | मुबलक पाण्यामुळे मत्स्य व्यवसायाला उभारी!
मुबलक पाण्यामुळे मत्स्य व्यवसायाला उभारी!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात आॅक्टोबरअखेर कोसळलेल्या परतीच्या पावसामुळे सर्वच तलाव, धरणे तुडूंब झाले असून नदीपात्रांमध्येही मुबलक जलसाठा झाला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निकाली निघण्यासोबतच अडचणीत सापडलेल्या मत्स्यव्यवसायालाही नवी उभारी मिळाली आहे.
जिल्ह्यात १४५ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना १३९ धरणांमध्ये अधिकृतरित्या मत्स्यव्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. चालूवर्षी पारित झालेल्या सुधारित शासन निर्णयानुसार त्यातील ६५ धरणांचा ठेका सहकारी संस्थांना विनामुल्य देण्यात आलेला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये सद्य:स्थितीत मुबलक पाणीसाठा असल्यामुळे मत्स्यबिजांची वाढ समाधानकारक पद्धतीने होत असून यामाध्यमातून विशेषत: बेरोजगार युवकांना हक्काचा रोजगार प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड, कारंजा लाड आणि मानोरा या सहाही तालुक्यांमधील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात मासळीचे उत्पादन होत असून ती प्रामुख्याने वाशिम, हिंगोली, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी पाठविली जात असल्याची माहिती या व्यवसायात असलेल्या राजू सहातोंडे यांनी दिली. केवळ पुरेश प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यामुळे ही बाब शक्य झाली असून मत्स्त्यव्यवसायाला उभारी मिळाली आहे.


जिल्ह्यातील नदीपात्रांमध्येही होतेय मासेमारी
लघूपाटबंधारे विभागाने वेळीच योग्य नियोजन केल्यामुळे जिल्ह्यातील अरूणावती, अडाण-मडाण, पैनगंगा आदी नदीपात्रांमध्येही सद्य:स्थितीत बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे. प्रशासनाच्या परवानगीने या नदीपात्रांमध्येही मासेमारी केली जात आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेले गाव तलाव, पाझर तलावांमध्येही मासेमारीला परवानगी देण्यात आल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बेरोजगार युवकांची सोय झाली आहे.


जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने मासळीची वाढ समाधानकारकरित्या होत आहे. यामाध्यमातून व्यवसाय देखील चांगला होत असल्याने शेकडो बेरोजगारांना हक्काचा रोजगार प्राप्त झाला आहे.
- राजू सहातोंडे, वाशिम


वाशिम जिल्ह्यात १५५ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांची नोंद असून त्यातील १४५ संस्थांना १३९ धरणांमध्ये मासेमारीची परवानगी देण्यात आलेली आहे. सुधारित शासन निर्णयानुसार त्यातील ६५ संस्थांकडून कुठलाही मोबदला आकारण्यात आलेला नाही. सद्या मत्स्यव्यवसायाला उभारी मिळालेली आहे.
- सुरेश भारती
सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, वाशिम

Web Title: Plenty of water boosts fishing business in washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.