प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी कायम

By Admin | Updated: August 14, 2014 02:19 IST2014-08-13T23:24:40+5:302014-08-14T02:19:15+5:30

राज्य शासनाने काढला आदेश : तिरंग्याचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य.

The plastic ban on the National Flag continues | प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी कायम

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी कायम

अकोला - उद्या आपला स्वातंत्र्यदिवस. त्यासाठीची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज छापून विक्रीसाठी बाजारात आणले जात आहेत.; परंतु दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दुसर्‍या दिवशी असे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज शहरभर कुठेही पडलेले दिसतात. ज्या राष्ट्रध्वजाला आदल्या दिवशी आपण सन्मानाने सलामी देतो, त्याचे दुसर्‍या दिवशी असे अक्षम्य हाल होतात., हे टाळण्यासाठी राज्य शासनाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना १४ जून रोजी खास परिपत्रक जारी करून देण्यात आल्या आहेत. भारतीय राष्ट्रध्वज राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचे प्रतीक आहे. आपल्या देशाच्या खेळाडूने पदक मिळविले किंवा एखाद्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर तो आपल्या देशाचा ध्वज घेऊन उभा राहतो तेव्हा अभिमानाने आपला उर भरून येतो. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन या दोन राष्ट्रीय दिनाच्या पृष्ठभूमीवर हाती राष्ट्रध्वज घेऊन मिरवणारी मुले, चेहर्‍यावर स्टिकर लावत देशप्रेमाची भावना व्यक्त करणारी तरुणाई आपण पाहत असतो.; परंतु असा आनंद साजरा होत असतानाच राष्ट्रध्वजाचा अनावधानाने अपमानही होण्याची शक्यता असते. हा अपमान रोखण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी घातली आहे. ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्हा राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्ह व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५0 व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे ध्वजाचा वापर करताना त्याचा योग्य मान राखला जावा. तसेच असे राष्ट्रध्वज रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी फेकून देऊ नयेत. राष्ट्रध्वज खराब झाल्याचे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट क रण्यात यावेत. *प्लास्टिक नष्ट होत नाही कोणत्याही वस्तूंसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक लवकर नष्ट होत नाही. यामुळे प्लास्टिकवर तयार करण्यात येणारे ध्वज खूप दिवस पडून राहण्याची शक्यता असते. ही राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. जे विक्रेते प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करतात त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार शासनाला आहेत. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करणे हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. *वाहनांवरचा राष्ट्रध्वज फाटू नये राष्ट्रध्वजाचा हा सन्मान एका दिवसासाठी न दर्शवता तो निरंतर कायम असणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वज फाटू नये, तो खाली पडू नये, वाहनांवर लावल्यानंतर तो उडून जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. शाळेला जाताना मुलांच्या हाती प्लास्टिकचा ध्वज देऊ नये तो दिल्यास त्याची जबाबदारी स्वीकारून तो कुठेही पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यासोबतच राष्ट्रध्जावर पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. अनेकदा तरुणाई आपल्या कैफात राष्ट्रध्वज हातात घेऊन वेगात दुचाक्या दामटतात. अशावेळी वार्‍याच्या दबावाने राष्ट्रध्वज फाटण्याची शक्यता असते. असे होऊ नये, यासाठी तरुणाईने काळजी घ्यायला हवी. *नागरिक व सामाजिक संघटनांनी काळजी घ्यावी आपला राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट व गणराज्य दिन २६ जानेवारी. यादिवशी सर्वत्र आपला राष्ट्रध्वज तिरंगा डौलाने फडकाविला जातो. अनेक ठिकाणी प्रभात फेर्‍यांमध्ये सहभागी विद्यार्थी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज घेऊन सहभागी होतात; परंतु नंतर तच राष्ट्रध्वज कुठेतरी पडून दिसतात. आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल आपल्याला आदर असतो. याच भावनेने आपण राष्ट्रध्वज बाळगतो. राष्ट्रध्वज विकत घेतल्यानंतर प्रत्येकाकडून त्याचा सन्मान राखला जाणे अपेक्षितच आहे. यासाठी नागरिक व सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. *प्लास्टिकचे राष्ट्रध्वज दिसल्यास पोलिसांना कळवा राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, यासाठी प्रशासनानेही स्थानिक पातळीवर नागरिकांना आवाहन करणे गरजेचे आहे. तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय यंत्रणेमार्फत व स्थानिक पोलिस यंत्रणेच्या मदतीने राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही आणि अशा प्रकारांना आळा बसेल याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: The plastic ban on the National Flag continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.